विहे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

मल्हारपेठ – विहे ग्रामपंचायतीत साडेचार वर्षे सत्तेवर असणाऱ्या देसाई गटाला राष्ट्रवादीच्या गटाने अखेर खिंडार पाडले. अविश्वास ठरावामुळे अडचणीत आलेल्या सरपंच आनंदराव विठ्ठल मोरे यांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत ठराव जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकविला.

विहे, ता. पाटण ग्रामपंचायतीचे सरपंच आनंदराव मोरे यांच्याविरुद्ध गत आठवड्यात ग्रामपंचायत जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या संबंधितास मदत केल्यामुळे देसाई गटाच्या सदस्यांनी त्यांच्यावर 1 जानेवारी 2019 रोजी अविश्वास ठराव मांडला होता. याबाबत तहसीलदार रामहरी भोसले, मल्हारपेठ येथील मंडल अधिकारी हणमंत शेजवळ, गाव कामगार तलाठी निवास पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजी चंदुगडे व पोलीस पाटील हिम्मत पवार यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. या बैठकीबाबत सर्व ग्रामपंचायतीच्या अकरा सदस्यांना तहसीलदार रामहरी भोसले यांच्यांमार्फत सभेच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र नोटिसा मिळूनही विशेष सभेस अकरा सदस्यापैकी पाच सदस्य गैरहजर होते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच आनंदराव मोरे यांच्यासह पाचही सदस्य हजर होते. या विशेष सभेत सरपंच आनंदराव मोरे यांच्याविरुद्ध कोणीही मतदान न केल्याने अखेर सरपंचपदी आनंदराव मोरे यांचीच वर्णी लागली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा विहे ग्रामपंचायतीवर फडकल्याची कार्यकर्त्यांमधून चर्चा सुरू होती. मात्र देसाई गटात सध्या नाराजीचा सूर दिसत आहे.

रविवारी विहे गावातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर सरपंच आनंदराव मोरे यांनी पाटण येथे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. याकामी विहे गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अविनाश पाटील, राहुल पाटील, रविंद्र पाटील, राजेंद्र पुजारी, संजय पाटील, विनायक मोरे, किरण पाटील, शेडगेवाडी सरपंच संतोष शेडगे, जयकर यादव, उत्तम पवार, संभाजी साळुंखे, चंद्रकांत पाटील, सर्जेराव माळी, डी. टी. कुंभार, भीमराव पाटील, विकास यादव, नंदकुमार साबळे, सुभाष यादव, वैभव लिंबारे आदींनी परिश्रम घेतले.

अतिक्रमण केलेल्या ज्या जागेमुळे सरपंच आनंदराव मोरे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. त्या जागेवरील अतिक्रमण संबंधितांनी एक दिवस अगोदरच काढून टाकले होते. तसेच दोन महिन्यानंतर विहे ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यामुळे ग्रामपंचायतीत झालेल्या उलथा पालथीमुळे संपूर्ण गावासह तालुक्‍यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत लागणारी सर्व कायदेशीर कार्यवाही केली होती. तरीही माझ्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला. आजपर्यंत काम करून व माझी बाजू मांडूनही मला विश्वासात न घेतल्यामुळे मी योग्य तो निर्णय घेतला आहे.
आनंदराव मोरे
सरपंच


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)