विहिरीत पडलेल्या लांडोरीला युवकांनी वाचवले

गुरुनाथ जाधव
सातारा, दि. 10
40 फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडोरीला 3 तासाच्या अथक प्रयत्नाने महादरे गावच्या युवकांनी जीवनदान दिले. सातारा शहरापासून जवळच महादरे गाव आहे. या गावामध्ये मोर व लांडोरीचा नित्य वावर पहायला मिळतो. गुरुवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी महादरे गाव परिसरातील विहिरीमध्ये लांडोर पडली असल्याची माहिती शेतामध्ये भांगलणी करणाऱ्या महिलांनी सायंकाळी घरी आल्यावर दिली. माहिती मिळताच तात्काळ लांडोरीला विहिरीतून बाहेर काढण्याकरता गोरख निपाणे, जनार्धन निपाणे, मनोज निपाणे, सनी पवार, मारुती साळुंखे, रवींद्र निपाणे, आदर्श निपाणे यांनी प्रयत्न सुरु केले. विहिर पाण्याने भरली होती त्यामध्ये पाऊस पडत होता. पोटात काहीच अन्न नसल्याने दुपार पासून लांडोरीचा जीवन मरणाचा संघर्ष विहरित सुरु होता. भेदरलेल्या अवस्थेत लांडोर आपले प्राण कंठाशी आणून विहिरीतील पाण्यामध्ये पोहत, कठड्यावर्ती तग धरून होती. आपल्या पिलांसाठी व्याकुळ झालेल्या लांडोरीच्या आयुष्याची दोरी बळकट होती. म्हणूनच महादरे गावातील तरुणांना तिचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. रात्रीच्या वेळी बॅटरीच्या प्रकाशात त्या मुक्‍या जीवाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले. या वेळी वनविभागाचे सुहास भोसले व प्रशांत पडवळ हे देखील उपस्थित होते.
विहिर रिंग बांधणीची असल्याने त्यावरून खाली उतरणे किंवा वरती येणे अवघड होते. मग दोर बांधून जाळीचा तराफा, आथवा बांबूच्या कामटीचा हारा बांधून लांडोरीला बाहेर काढता येईल अशी संकल्पना आस्थाचे विजय कुमार निंबाळकर यांनी सुचवली. सर्व युवकांनी मिळून तराफा बांधला व विहिरित पडलेल्या लांडोरीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. लांडोर जोपर्यंत तराफाच्या बाजूला येत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर तीन तासाच्या अथक प्रयत्नाने लांडोर तराफा जवळ आली. स्वतःहून तिने तराफा वर उडी मारली. जणू काय आपला जीव वाचवण्या करता या सर्वांची धडपड त्या मुक्‍या जीवाला देखील समजली होती. जशी का लांडोर तराफ्यात बसली मग तिला. हळू हळू दोराच्या साह्याने विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर लांडोरीला तिच्या अधिवासात सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी जनार्दन निपाणे यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त जमलेल्या मित्र परिवाराने लांडोरीचे प्राण वाचवल्याने खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा केल्याचे सर्वाना समाधान मिळाले.

मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचे महत्व आणि उपयोगिता निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. पर्यावरणामध्ये मोरांचे जितके महत्व आहे तितकेच लांडोरांचे आहे. महादरे येथील युवकांनी लांडोरांचे प्राण वाचवून त्याला त्याच्या अधिवासात सोडून वनविभागाला केलेले सहकार्य अनमोल आहे. महादरे येथील युवकाचे वनविभागाच्यावतीने अभिनंदन.
– अनिल अंजनकर
उपवनसंरक्षक, सातारा.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)