विस्कळीत पाणीपुरवठ्याचे खापर जलसंपदा विभागावर

पिंपरी – गेली दीड महिन्यापासून शहरातील विस्कळीत असलेल्या पाणी पुरवठ्याचे खापर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जलसंपदा विभागावर फोडले आहे. याशिवाय शहरांतर्गत होणाऱ्या 40 टक्के पाणीगळतीमुळे पाणीबाणी उद्‌भवली असल्याचा खुलासा त्यांनी सभागृहात केला. त्या समर्थनार्थ त्यांनी सभागृहात काही मिनिटांचे सादरीकरणही केले. मात्र, आयुक्तांचे हे सादरीकरण आणि तासाभराचा खुलासा नगरसेवकांना काही पटला नाही. याच विषयावर नगरसेवकांची लांबत असलेली चर्चा मध्येच थांबवत महापौर राहुल जाधव यांनी विषयपत्रिका चर्चेला घेत या विषयाला पूर्णविराम दिला.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा विषय महापालिकेच्या 20 ऑक्‍टोबरच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला होता. साडे सहा तास चाललेल्या एकाच विषयावरील चर्चेनंतर प्रशासनाचा खुलासा न घेताच ही सभा रात्री साडे आठ वाजता तहकूब केली होती. त्यानंतर बुधवारी (दि. 31) ही तहकूब सभा पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सभेच्या सुरुवातीला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रशासनाचा खुलासा केला. यामध्ये त्यांनी अनेक तांत्रिक कारणे सभागृहासमोर मांडली. जलसंपदा विभागाकडून सोडल्या जणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन व बंधाऱ्यातून होणाऱ्या उपशाचे नियोजन चुकले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कायम न ठेवता आल्याने ही समस्या उद्‌भवल्याचा खुलासा त्यांनी केला. याशिवाय 18 ऑक्‍टोबरला रावेत पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने त्यामध्ये भर पडल्याचे कारण दिले. याशिवाय शहराला केल्या जाणाऱ्या पुरवठ्यापैकी होणारी 40 टक्के पाणीगळती देखील या परिस्थितीला कारणीभूत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय वाकडमधील ना हरकत प्रमाणपत्रांबद्दल सुरू असलेल्या दोषी आढळल्यास कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यावर कठोर कारवाई करणार असून, याच कारणामुळे त्यांच्याकडे दिलेला सहशहर अभियंता पदाचा अतिरिक्‍त पदभार काढून घेण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली.

दरम्यान, आयुक्तांचा हा खुलासा न पटल्याने नगरसेवकांनी देखील प्रशासनाला या विषयावरून चांगलेच धारेवर धरले. आयुक्तांचा खुलासा मंत्रमुग्ध असल्याचे सांगत, असा खुलासा आम्ही प्रभागातील नागरिकांना देऊ शकत नाही. पाणी समस्या दीड महिन्यांपासून नव्हे, तर दीड वर्षांपासून भेडसावत आहे. अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा हा अपमान आहे, असे खडेबोल भाजप नगरसेविका प्रियंका बारसे यांनी आयुक्तांना सुनावले. भोसरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राजकीय दबाव असून, ते व्यवस्थितपणे काम करू शकत नसल्याचे सांगत, आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी ठाम राहण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी केली. तर या प्रश्‍नावर उपाययोजना करण्यासाठी गटनेत्यांची समिती स्थापन करावी, या विषयातील तज्ज्ञ व सेवानिवृत्तांची मदत घेण्याची मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली. जलसंपदा विभागाकडून समन्वय ठेवला जात नसल्यास, त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची मागण भाजपचे विकास डोळस यांनी केली. तर गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियम आणि लोढा गृहप्रकल्पासाठी पवना नदीमधून पाणी उचलले जात असल्यानेच शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात होत असल्याचा आरोप मनसे गटनेते सचिन चिखले यांनी केला. यावर हे पाणी शहराच्या आरक्षित कोट्यातून उचलले जात नसल्याचा खुलासा महापौर जाधव यांनी केला.

वाकडमध्ये आमदार, खासदारांच्या “एनओसी’
शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी वाकड मधील पाणीपुरवठा ना हरकत प्रमाणपत्रांकडे लक्ष वेधत, यामध्ये खासदार व आमदारांच्या “एनओसी’ असल्याचे सांगताच सभागृहात एकच खळबळ उडाली. एकट्या रामदास तांबे यांची चौकशी मान्य नाही. या प्रकरणातील सर्वच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. अन्यथा याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)