विसापूर किल्ल्यावर सापडले तोफगोळे

गड भटकंती : गडावर 8 ते 10 किलो वजनाचे तीन तोफगोळे सापडले

पवनानगर – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाच्या वतीने गेली 18 वर्षे मावळ तालुक्‍यातील लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य केले जाते. दरवर्षी प्रमाणे दिवाळीमध्ये मंचाच्या वतीने विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दीपोत्सवानंतर मंचाचे कार्यकर्ते गड भटकंती करीत असताना उत्तर तटबंदीकडील दारुगोळा कोठाराजवळ भुपृष्ठावर एक लोखंडी तोफगोळा आढळला. कार्यकर्त्यांनी आजूबाजुला पाहणी केली असता आणखी 8 ते 10 किलो वजनाचे दोन लोखंडी तोफगोळे सापडले. हे तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारात मोडतात. या तोफगोळ्यांमध्ये दारू भरून त्यानंतर वातीद्वारे उडविले जात असत, अशी माहिती डेक्‍कन कॉलेजचे तज्ज्ञ इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी दिली. हे तोफगोळे पुरातत्व विभागाच्या कर्मचारी हेमंत वाघमारे व सुभाष दहिभाते यांच्याकडे सुपूर्द केले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साक्षात दुर्गलक्ष्मी अवतरल्याचा साक्षात्कार झाला.

या वेळी संदीप गाडे, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, वैभव गरवड, अमोल गोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मंचाच्या पाठपुराव्यानंतर पुरातत्व विभागाने नुकतेच शिवमंदिरचा जीर्णोद्धार केला आहे. पावसाळ्यात दक्षिणेकडील तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. तसेच गडावरील ऐतिहासिक वास्तूंची देखील दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या तटबंदीची व वास्तूंची दुरुस्ती लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी मंचातर्फे करण्यात आली आहे. यानिमित्ताने अमूल्य ऐतिहासिक ठेवा जपला जाईल व लुप्त होत चाललेला शिवकालीन इतिहास दुर्गप्रेमींना उपलब्ध होईल.

मंचातर्फे दरवर्षी प्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता लोहगड किल्ल्यावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)