विसर्जन मिरवणूकीमध्ये डॉल्बी लावू दिला जाणार नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळची गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक, उत्साहात, सुरक्षित वातावरणात, शांततेत पण डॉल्बीमुक्तच होईल, असे निक्षून सांगितले.

शहरातील विविध मंडळांचे अध्यक्ष, प्रमुख यांना डॉल्बीमुक्त गणेश उत्सव व डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक याबाबत आवाहन करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी महापौर हसीना फरास, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत पाटील यांनी मंडळांना सुचित करताना सांगितले की, विसर्जन मिरवणूकीत कोणत्याही मंडळाने डॉल्बी लावायचा प्रयत्न केला तर प्रशासन त्याच्यावर कारवाई करण्यात हयगय करणार नाही. कठोर कारवाई करण्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना कायद्याचा अभ्यास करून केवळ डॉल्बी पुरविणाऱ्यांकरीता कलम 144 लावण्याचे निर्देशही दिले. डॉल्बी उपकरणे पुरविणाऱ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले की, डॉल्बी मालकांनी पोलीस मुख्यालयाला डॉल्बीची उपकरणे जमा करावीत. ही उपकरणे जप्त केली नसल्याने त्यांना ती गणेश उत्सावानंतर परत केली जातील. या आवाहनाला जे प्रतिसाद देणार नाहीत, त्यांची डॉल्बीची उपकरणे जप्त केली जातील. त्यांना ती कोर्टातून सोडवून घ्यावी लागतील तसेच त्यांच्यावर गुन्हेही दाखल होतील, असेही त्यांनी सूचीत केले.

महाव्दारला मिरवणुकीतून येणाऱ्या प्रत्येक मंडळाची कसून तपासणी करण्यात येईल, ज्यांच्याकडे आक्षेपार्ह डॉल्बी उपकरणे सापडतील त्यांना मिरवणुकीमध्ये सहभागी होता येणार नाही. इतके सर्व करूनही जर कोणी डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केला तर ध्वनी प्रदूषण कायदा अंतर्गत असलेली कलमे लावली जातील. यामध्ये 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच डॉल्बी जॅमरबाबत करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळून असे उपकरण मिळाले आहे की, डॉल्बी सिस्टीममधील महत्वाचा भाग निकामी होईल की, ज्याची खरेदी पुणे-मुंबईशिवाय होऊ शकणार नाही असेही त्यांनी सांगितले.

याबैठकीत विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी डॉल्बीचे दुष्परिणाम मांडले. यामध्ये त्यांनी महिला, लहान मुले, तरूण, जेष्ठ नागरिक या सर्वांसाठी डॉल्बीचे परिणाम अत्यंत घातक सिध्द झाले आहेत तसेच ध्वनी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयही अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. जिल्ह्यात ध्वनी लहरींची क्षमता मोजण्यासाठी 80 डेसीबल मीटर उपलब्ध झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने चालणारे पुरोगामी विचारांचे शहर आहे. या शहरात डॉल्बी मुक्तीबाबतही सकारात्मक प्रतिसाद मिळून 125 वर्षांची परंपरा असणाऱ्या गणेशउत्सवात डॉल्बीवर होणारा खर्च विधायक कामांवर वापरून सर्व समाजासाठी दिशादर्शक काम करावे, असे आवाहन केले. तसेच डॉल्बीच्या आवाजाने तरूण पिढी बरबाद होत असून ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाल्यास विविध करणांसाठी होणाऱ्या पोलीस पडताळणीमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव पारंपारीक पध्दतीने, महिला व मुलींसाठी सुरक्षित वातावरणात आणि जेष्ठ नागरिकांना आनंददायी ठरेल, अशा पध्दतीने साजरा करूनया, असे आवाहन केले तसेच मिक्‍सर, बेस आणि बेड ही तीन स्तरीय उपकरणांना परवानगी दिली जाणार नाही, असेही सांगितले.

पोलीस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, कोल्हापुरात 653 सार्वजनिक गणेश मूर्तींचे आगमन झाले असून 99 टक्के गणेश मंडळांनी सहकार्य केले त्याबद्दल आभार मानून विसर्जन मिरवणूकही डॉल्बीमुक्त करून विधायकतेच्या दृष्टिने पावले उचलूया, असे आवाहन केले. या बैठकीत काही गणेश मंडळांनी दोन बॉक्‍सवर डॉल्बी लावण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यावर अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आम्हाला दोन किंवा तीन बॉक्‍स या बाबी समजत नाहीत तर ध्वनी लहरींची क्षमता समजते त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आवहनाला अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व डॉल्बीमुक्त वातावरणात मिरवणूक आनंदात व उत्साहात पार पाडण्याची ग्वाही दिली. यावेळी शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी व अन्य संबधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)