विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह! (अग्रलेख)

लोकसभेच्या येत्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्च्या हाती “राफेल’सारखा मुद्दा हातात आला असताना, या प्रयत्नांना बळ देण्याऐवजी पवार वेगळी राजकीय खेळी खेळत असल्याचा संशय त्यांच्या विधानामुळे निर्माण झाला. पवार यांच्या अशा विधानांमुळे त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असून त्यांनीच आता कृतीतून “कात्रजचा घाट’ दाखविणे बंद करायला हवे.

 

राजकीय नेत्यांना संभ्रम निर्माण करणारी विधाने करायची सवय असते. त्याचे पडसाद काय उमटतात, हे पाहून विधानांवर ठाम राहायचे, की फारच अंगलट आले, म्हणून माघार घ्यायची हे परिस्थितीनुरूप ठरत असते. काही वादग्रस्त विधाने करून राजकारणात आपण दखलपात्र आहोत, हे दाखविण्याची काहींना सवय असते. काहींना पक्ष वाढविण्याच्या चिंतेपेक्षा, दुसऱ्याला आडकाठी कशी करता येईल; किंवा दुसऱ्याचा फायदा कसा होईल, हे पाहण्यात जास्त रस असतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतीत तर कायम अविश्‍वासाचे वातावरण असते. वर्ष 1978 पासून त्यांनी घेतलेले निर्णय पाहिले, तर त्यांच्या उक्ती आणि कृतीत फरक दिसतो. त्यामुळे पवार यांच्याबाबतीतच “कात्रजचा घाट’ दाखविण्याचा नवा वाक्‌प्रचार रुढ झाला. पवार यांचे सर्व पक्षांत मित्र आहेत, ही चांगली बाब आहे; परंतु कधी कधी आपल्या शिष्यांना मदत करण्याच्या नादात ते आपल्याच पक्षाचे नुकसान करीत असतात, हे त्यांच्या लक्षात येत नाही, असे थोडेच आहे? “जे न देखे रवी, ते देखे कवी’ अशी एक म्हण आहे. पवार यांच्याबाबतीत ती सार्थ ठरते.

 

-Ads-

कोणतेही आरोप त्यांना लगेच चिकटतात. त्याचा खुलासा करण्याच्या भानगडीत ते पडत नाही. पवारांच्या धक्कातंत्राचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच त्यांनी भाजपला न मागता बाहेरून पाठिंबा देऊन टाकला. अर्थात पवारांना कोणतीही विचारसरणी अमान्य नसते. आता ज्या भाजपचा ते तिरस्कार करतात, त्यांना सत्तेत येण्यासाठी पुलोदच्या काळात पवार यांनीच मदत केली होती. पवार यांच्या कामाची मोहिनी सर्वपक्षीयांना आहेच. त्यामुळे अगोदर पवार यांच्यावर टीका करणारे सत्तेत आल्यानंतर बारामतीला भेट देतात. पवार यांचे व्यक्तिमत्त्व लोहचुंबकासारखेच आहे, यात वाद नाही. राजकारणात आजूबाजूला काय घडते आहे, याचा अंदाज घेऊन वक्‍तव्य करण्यात पवार यांचा हात कुणी धरू शकत नाही. “भारताच्या राजकारणात कसलेला पैलवान’ म्हणून त्यांची ओळख आहे.

 

सर्वांना पवार आपले वाटतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते आपले राजकीय गुरू वाटतात; परंतु पवार संशय निर्माण करणारी विधाने का करतात, त्यांच्यावर कितीही आरोप झाले, तरी ते शांत का राहतात आणि नंतर अचानक एखाद्या विधानाचा खुलासा का करतात, हे त्यांच्या सोबत आयुष्य घालविलेल्यांनाही कळत नाही. पवार यांचे विधान, त्याचा मतितार्थ आणि पवार यांना अपेक्षित असलेला अर्थ कधीच काढता आलेला नाही. आताही “राफेल’ प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी मोदींसह भाजपला लक्ष्य केले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रॅन्कॉईस ओलॉंद यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे भारत व फ्रान्सचे सरकार अडचणीत आले आहे. अनिल अंबानीच्या रिलायन्सचेच नाव भारत सरकारने कसे पाठविले आणि फ्रान्सच्या कंपनीशी सामंजस्य करारासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लि.(एचएएल) या सरकारी कंपनीला कसे डावलण्यात आले, हे ओलॉंद यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले. फ्रान्स सरकारनेही हात झटकल्याने मोदी व अंबानी अडचणीत आले. मोदी यांचे जसे उद्योगजगताशी चांगले संबंध आहेत, तसे पवारांचेही आहेत. त्यामुळे तर पवार मोदी-अंबानी यांच्या मदतीला धावले नाहीत ना, असा प्रश्‍न पडतो. विशेष म्हणजे अंबानी यांनी कॉंग्रेसला पाच हजार कोटी रुपयांची अब्रुनुकसान भरपाईची नोटीस बजावली असतानाही कॉंग्रेसने आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. असे असताना पवार यांनी मोदी यांना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र का दिले असावे? अडचणीच्या काळात पवार मदतीला धावल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तत्परतेने पवारांच्या विधानाचे ट्विट करून त्यांचे आभार मानले. त्यामुळे पवार समर्थकांची पंचाईत झाली. सुप्रिया सुळे यांनी पवार यांची बाजू मांडली; परंतु या सर्व गदारोळात तारिक अन्वरसारखा चांगला नेता पक्ष सोडून गेला.

 

राष्ट्रवादीच्या बिहार शाखेचे अस्तित्त्वच जणणू संपले आहे. आता आपल्याच प्रवक्‍त्यांची अडचण होते आहे, हे लक्षात आल्याने पवार यांनी आपल्या विधानाचा गैरअर्थ काढल्याचे बीडमध्ये स्पष्ट केले. अर्थात या वेळी कॉंग्रेसने पवार यांच्या विधानाविषयी संयम बाळगला. सध्याच्या काळात पवार यांना दुखवून चालणार नाही, हे कॉंग्रेसच्या नेत्यांना कळले. मल्लिकार्जुन खरगे आणि पवार यांच्या भेटीने दोन्ही पक्षांत अंतर वाढविण्याच्या प्रयत्नांना आपोआप खीळ बसली. छत्तीसगडमध्ये मायावती-अजित जोगी या जोडगोळीच्या युतीवर ही कॉंग्रेसने फारसे भाष्य केले नव्हते. तसेच त्यांनी पवारांच्या विधानांवर काहीच टिप्पणी केली नाही. त्यामुळे पवार यांचा असे विधान करण्यामागचा उद्देश साध्य झाला नाही. अन्वर यांनी पवार यांच्या विश्वासार्हतेचा मुद्दाही ऐरणीवर आणला. लोकसभेच्या येत्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्च्या हाती “राफेल’सारखा मुद्दा हातात आला असताना, या प्रयत्नांना बळ देण्याऐवजी पवार वेगळी राजकीय खेळी खेळत असल्याचा संशय त्यांच्या विधानामुळे निर्माण झाला. पवार यांच्या अशा विधानांमुळे त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असून त्यांनीच आता कृतीतून “कात्रजचा’ घाट दाखविणे बंद करायला हवे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)