विश्‍वविक्रमी कामगिरीनंतर भाकर, मिथरवाल चौथ्या स्थानी

चॅंगवोन – मनू भाकर आणि ओम मिथरवाल या भारतीय जोडीने पात्रता फेरीत विश्‍वविक्रमी कामगिरी केल्यानंतरही विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे मिश्र दुहेरीतील 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारातील त्यांचे पदक थोडक्‍यात हुकले. त्यांना या प्रकारात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मनू भाकर आणि ओम मिथरवाल यांनी त्याआधी स्पर्धेच्या पात्रता फेरीत 778 गुणांचा विश्‍वविक्रम नोंदविताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर जर्मनीच्या ख्रिश्‍चन आणि सॅन्ड्रा रेट्‌झ या जोडीने त्यांच्या खालोखाल गुण घेत पाचव्या क्रमांकावरून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यांनी अंतिम फेरीत रौप्यपदक कमावले. चीनच्या शिओजिंग जि व जिआयु वु या जोडीने अंतिम फेरीत 487.7 गुणांची नोंद करताना विश्‍वविक्रम नोंदवत सुवर्णपदकाचीही कमाई केली.

यावेळी सर्बियाच्या दामिर मिकेक आणि झोराना अरुनोविच या जोडीने कांस्यपदकाची कमाई केली.भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत विश्‍वचषक स्पर्धेत आठवेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यातील केवळ शहाझार रिझ्वी याला 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात पदक मिळवता आले असून इतर भारतीय खेळाडूंनी निराशा केली आहे. त्याआधी आजच्या दिवसातील पहिल्या स्पर्धेत भारताच्या संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)