विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत शाहझार रिझवीला रौप्यपदक 

केवळ दोन दशांश गुणांनी हुकले एअर पिस्तोल प्रकारातील सुवर्णपदक 
चॅंगवोन – युवा नेमबाज शाहझार रिझवीने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात रौप्यपदकाची कमाई करताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या पदकांचे खाते उघडले. विशेष म्हणजे शाहझारचे सुवर्णपदक केवळ दोन दशांश गुणांनी हुकले. शाहझार रिझवीने गेल्याच महिन्यात मेक्‍सिकोतील ग्वादालजारा येथे झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत पदार्पणातच सुवर्णपदक पटकावले होते. विश्‍वचषक स्पर्धामालिकेतील त्याचे हे पहिलेच सुवर्णपदक होते. त्यामुळे त्याच्याकडून याही वेळी सोनेरी पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा होती. परंतु अत्यंत रोमांचकारी झुंजीनंतर शाहझारला रशियाच्या आर्टेम चेर्नोसोव्हकडूनव केवळ 0.2 गुणांनी पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आर्टेम चेर्नोसोव्हने अंतिम फेरीतील 240 गुणांच्या कामगिरीमुळे सुवर्णपदकाची कमाई केली. तर 239.8 गुणांची कमाई करणाऱ्या शाहझार रिझवीने रौप्यपदकाची निश्‍चिती केली. बल्गेरियाच्या सॅम्युएल डॉन्कोव्हने 217.1 गुणांची कमाई केल्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी शाहझारने प्राथमिक फेरीत 582 गुणांची नोंद करताना सहाव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धा सुरू होऊन दोन दिवस उलटून गेल्यावरही भारताची पाटी कोरी राहिल्यामुळे 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात शाहझार रिझवी, राष्ट्रकुल सुवर्णविजेता जितू राय, तसेच कांस्यविजेता ओमप्रकाश मिठारवाल यांच्याकडून देशाला अपेक्षा होत्या. त्यातील शाहझार रिझवीने रौप्यपदक पटकावून बऱ्याच प्रमाणात अपेक्षापूर्ती केली. मात्र जितू राय व ओमप्रकाश या दोघांचेही आव्हान प्राथमिक फेरीत संपुष्टात आल्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. ओमप्रकाश 581 गुणांसह 11 व्या क्रमांकावर राहिला, तर जितू राय 575 गुणांच्या निराशाजनक कामगिरीसह 38व्या क्रमांकावर फेकला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)