विश्वभाषेवर प्रेम करताना मातृभाषेला विसरू नका

प्रवीण दवणे ः सासवड येथे 20 व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनास उत्साहात प्रारंभ
सासवड -आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह ज्यांनी या देशात क्रांती केली. या सर्वांचे विश्वभाषेवर प्रभुत्व होते. परंतु तरीही ते मातृभाषा कधीही विसरले नाहीत. परंतु सध्या मात्र इतर भाषेवर प्रभुत्व मिळविण्याच्या प्रयत्नात आपली मातृभाषा लोप पावत चालली आहे, असे वाटते. ज्या वेळी मराठी शाळा बंद होते, त्यावेळी केवळ एक शाळा बंद होत नाही, तर त्या माध्यमातून मराठी भाषेचा एक एक कप्पा बंद होत आहे. त्यामुळे मराठी भाषेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. म्हणून साहित्य संमेलनामध्ये केवळ परिसंवाद म्हणून भाषेवर चर्चा नको तर राज्याच्या नेतृत्वाने याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. तरच मराठी भाषा टिकेल, अशी प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे यांनी व्यक्‍त केली.
सासवड (ता. पुरंदर) येथील अत्रे सांस्कृतिक भवनमध्ये आचार्य अत्रे यांच्या 119 व्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठाण, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड यांच्या संयुक्‍त विद्यमाने 20 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना दवणे बोलत होते.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, स्वागताध्यक्ष बंडूकाका जगताप, अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेचे सासवड अध्यक्ष रावसाहेब पवार, साहित्य कला प्रसारकचे अध्यक्ष सचिन इटकर, माजी आमदार अशोक टेकवडे, सभापती अतुल म्हस्के, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, गौरव कोलते तसेच साहित्यिक, लेखक, कवी, साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री शिंदे म्हणाले की, आचार्य अत्रेंचा दबदबा महाराष्ट्राला विसरता येणार नाही. त्यांच्या लेखणीने अनेकांना घायाळ केले. तर अनेकांच्या डोळ्यात अंजन घातले. समाजातील दुःख टिपण्याची व समाजाला मार्गदर्शन करण्याची भूमिका केली म्हणूनच महाराष्टाच्या लढ्याचे नेतृत्व मिळाले. अशा शब्दात अत्रेंचा गौरव केला.
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, येथील मातीचा गुणधर्म वेगळा आहे. शूर वीरांची भूमी, योध्यांची भूमी, साधू संतांची भूमी असल्यानेच या मातीत अत्रेंनी जन्म घेतला असावा असे सांगितले.
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान उदघाटन सोहळ्यानंतर रात्री उशिरापर्यंत कवी संमेलन सुरु होते. ज्येष्ठ कवी दशरथ यादव यांनी या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. राज्यातील विविध कवींनी सहभाग घेतला.

  • सोमवारचे कार्यक्रम

सोमवारी (दि. 14) सकाळी आचार्य अत्रे साहित्य या विषयावर परिसंवाद सादर होईल. ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत. तसेच दुपारी संस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. त्यानंतर बाल आनंद मेळाव्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. त्यानंतर सायंकाळी संमेलनाचा समारोप होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)