#विशेष लेख: प्रत्येक गाव व्हावे पर्यटनसंपन्न

सुदर्शन चौधरी

पर्यटन हा व्यवसाय कमालीचे उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. 2011 मध्ये संपूर्ण भारतामध्ये फक्त पर्यटन या व्यवसायात 3 लाख 68 हजार कोटींची उलाढाल झाली होती. ग्रामीण भारत दर्शन, वन्यजीव, अभयारण्य आणि सांस्कृतिक पर्यटनामध्ये आपल्या गावांचा हात कुणीच धरू शकत नाही. ग्रामीण भाग अशा गोष्टींसाठी नेहमीच संपन्न राहिला आहे. प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्य असते. संपूर्ण गावाने त्या वैशिष्ट्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचा विकास केला तर गावाची ती ओळख बनू शकते. गावाने आपले वेगळेपण ओळखले तर महाराष्ट्रातील प्रत्येक गाव पर्यटनसंपन्न बनू शकते.

गावचा संरपच या नात्याने माझे अनेक गावांचे दौरे होत असतात. त्यामध्ये मला प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक गाव हे दुसऱ्या गावापेक्षा अनेक अंगाने भिन्न असते. म्हणजे प्रत्येक गावाची आपली एक स्वतंत्र ओळख असते, आपले वेगळे अस्तित्व असते. त्या ओळखीनेच गावाचे वेगळेपणं जपलेले असते.

अगदी एक वेस असलेली दोन गावेही वेगवेगळ्या संस्कृत्या टिकवून असतात. त्यांची ती संस्कृती ही त्यांची ओळख असते. एका गावाच्या लोकांना दुसऱ्या गावाच्या संस्कृतीचे नेहमीच कुतूहल असते. संस्कृतीसोबतच भौगोलिक दृष्टीनेही प्रत्येक गाव आपले वेगळेपण टिकवून असते.

भौगोलिक गोष्टींसोबत पिकपाण्यानेही प्रत्येक गावाचे वेगळेपण अबाधित राहिलेले असते. म्हणजे सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा कितीतरी वैशिष्ट्यांनी प्रत्येक गावे समृद्ध असतात. हे वैशिष्ट आपल्या गावाची खासियत आहे, हे त्या गावातल्या लोकांनी ओळखले आणि त्या वैशिष्ट्यांच्या सुधारणेवर भर दिला तर ते वैशिष्ट्य त्या गावाला कमालीची प्रसिद्धी मिळवून देऊ शकते.

आपण बऱ्याच गावांमध्ये जातो जिथे ऐतिहासिक मंदिरे पाहायला मिळतात त्या मंदिराचा इतिहास बरेचदा त्या गावातील लोकांनाही माहिती नसतो. काही मंदिरे अगदी गावाच्या बाहेर असतात. म्हणजे ती मंदिरे कागदोपत्री त्या गावाच्या हद्दीत येतात. पण, ते मंदिर हे आपल्या गावचे वैशिष्ट्य बनू शकते याचा गावाकडच्या साध्याभोळ्या लोकांना गंधही नसतो. शहरातले लोक येतात तेव्हा आवर्जून अशा मंदिराशेजारी फोटो काढतात. काहीजण मंदिराचे सुंदर चित्र काढतात.

चित्रपटाच्या काही सीनचे शूटही अशा मंदिराशेजारी होते, पण प्रत्यक्षात आपल्याला कधीच ते मंदिर किती सुंदर आहे, याचा अंदाज आलेला नसतो. “सैराट’ चित्रपटाचे उदाहरण घ्या. त्यामध्ये दाखवलेले कितीतरी सीन करमाळ्यातल्या जेऊर, केम, वांगी, पोफळज, मांजरगाव अशा छोट्याशा खेडेगावातले आहेत. “सैराट’ आला आणि ही गावे लोकांसाठी पर्यटनस्थळे बनली. तशी कितीतरी सुंदर ठिकाणे, किंबहुना त्यापेक्षा जास्त सुंदर ठिकाणे आपल्या गावांमध्ये असतात. त्या ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला तर गावामध्ये नवा रोजगार निर्माण होऊ शकतो.

पर्यटन हा व्यवसाय कमालीचे उत्पन्न देणारा व्यवसाय आहे, हे सर्वात आधी लक्षात घ्यायला पाहिजे. 2011 मध्ये संपूर्ण भारतामध्ये फक्त पर्यटन या व्यवसायात 3 लाख 68 हजार कोटींची उलाढाल झाली होती. देशातले चार कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. 2020 मध्ये पर्यटनक्षेत्रात साडेआठ हजार कोटींची उलाढाल होण्याची शक्‍यता असून आठ कोटी लोकांना या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2012 मध्ये दोन कोटी परदेशी पर्यटक भारतभेटीला आले होते आणि त्यातील 51 लाख लोकांनी महाराष्ट्राला भेट दिली होती.

तर देशातील सात कोटी पर्यटक दरवर्षी महाराष्ट्राला भेट देत असतात. त्यामध्ये दरवर्षी वाढ होतच आहे. महाराष्ट्राला भेट देणारे बहुतेक पर्यटक धार्मिक, इकोटुरिझम, वैद्यकीय, व्यावसायिक, ग्रामीण भारत दर्शन, सांस्कृतिक, वन्यजीव, अभयारण्य पर्यटन आदी गोष्टींच्या हेतूने भेट देतात. यातील ग्रामीण भारत दर्शन, वन्यजीव, अभयारण्य आणि सांस्कृतिक पर्यटनामध्ये आपल्या गावांचा हात कुणीच धरू शकत नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. ग्रामीण भाग अशा गोष्टींसाठी नेहमीच संपन्न राहिला आहे. त्याला फक्त विकासाची जोड देणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यातील मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध झाले आहे. निघोज रांजणखळग्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसे प्रत्येक गावाने आपले वैशिष्ट जगासमोर आणले पाहिजे. त्यासाठी गावातील तरुणांनी एकत्र आले पाहिजे. ज्येष्टांनी या युवा पिढीला मार्गदर्शन केले पाहिजे आणि आपले गावही पर्यटनाच्या कोणत्या अंगाने सक्षम आहे हे दाखवून दिले पाहिजे.
सध्या पर्यटनावर काही मोजक्‍या परिसराचे वर्चस्व आहे. जी गावे लोकप्रिय झाली आहेत त्याच ठिकाणी पर्यटक जातात. पण, एका गावाला एका पर्यटकाने भेट दिली की त्यानंतर पुढच्या वेळी तो वेगळ्या गावाचा शोधात असतो. इंटरनेटवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पर्यटन सर्च केले तर ठराविक गावांचीच यादी येत असते.

प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त गावांमध्ये पर्यटनाचा मोठा खजाना आहे. तो ओळखून आपण तो जगासमोर मांडला पाहिजे. पर्यटकांनाही वेगवेगळ्या गावांचा पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. पर्यटकनांना केवळ ऐतिहासिक वास्तू आवडतात आणि तशा वास्तू आपल्या गावात नाही मग पर्यटक आपल्या गावाला का भेट देतील? असा विचार करणाऱ्या गावकऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकाच्या गावाचे उदाहरण लक्षात घ्यावे. या गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा प्रकल्प राबविण्यात आला.

आज देशातील पहिले पुस्तकाचे गाव ही आगळीवेगळी ओळख या गावाला मिळाली आहे. देशभरातील पर्यटक आवर्जून या गावाला भेट देतात. म्हणजे पर्यटक हे पर्यटनाच्या शोधात असतात. त्यांना वेगवेगळे पर्याय देणे हे आपल्या हातात आहे. आपल्या गावाची समृद्धी लक्षात घेतली आणि त्याच्या विकासावर जोर दिला तर भविष्यात आपले गावही पर्यटनसंपन्न असेल. असे केल्याने कोण्या एका माणसाचा किंवा एका घराचा फायदा होणार नाही, तर संपूर्ण गावाच्या विकासात भर पडणार आहे, हे प्रत्येक गावकऱ्याने लक्षात घ्यायला हवे.

(लेखक विद्यमान सरपंच आहेत.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)