विशेष मुलांकडून दिड दिवसांच्या गणरायाला निरोप

पुणे- “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, दहा ढोल ताशा पथकातील वादकांनी केलेले एकत्रित वादन आणि खांद्यावर पालखी घेऊन लाडक्‍या गणरायाला निरोप देताना “मोरया, मोरया’ अशा घोषणा देत दृष्टीहिन, अनाथ आणि देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांनी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला. ऐतिहासिक विंचूरकर वाड्यापासून काढलेल्या मिरवणुकीमध्ये विशेष मुलांना गणेशोत्सवाचा आनंद देत तरुणाईने देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

मैत्रयुवा फाउंडेशनतर्फे वंचित मुलांसाठी आयोजित विशेष गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, वनिता मेहता, परिक्षीत कुलकर्णी, राजनंदिनी परिहार, सिद्धार्थ गायकवाड, सागर धुमाळ, प्रतिक्षा क्षीरसागर आदी उपस्थित होते. नेहरु स्टेडियम येथील अद्वैत परिवारमधील दृष्टीहीन मुले, कोथरुडमधील बालसदनमधील अनाथ मुली आणि बुधवार पेठेतील सहेली संस्थेतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या 45 मुला-मुलींनी या गणेशोत्सवातील मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला.

संकेत देशपांडे म्हणाले, वेगळ्या विश्‍वात रममाण होणाऱ्या या चिमुकल्यांकरीता अशा प्रकारचे कार्यक्रम समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता उपयुक्त ठरतील. मिरवणुकीच्या गर्दीत या मुलांना ढोल-ताशा वादनाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे पुण्यातील दहा पथकांनी एकत्रितपणे केलेले वादन हा पुण्यातील पहिलाच वेगळा प्रयोग होता. श्रीराम, रमणबाग, ज्ञानप्रबोधिनी, स्वरुपवर्धिनी, शौर्य, शिववर्धन, श्रीशिवदुर्ग, वज्र, युवा आणि कलावंत आदी ढोल-ताशा पथकांतील वादकांनी कोणतेही मानधन न घेता विनामूल्य सेवा देत शनिवारी एकत्रितपणे वादन करुन विशेष मुलांना वेगळाच आनंद दिला. “तुमचा-आमचा-सर्वांचा’ अशा प्रकारचा हा आगळावेगळा उपक्रम होता.

विंचूरकर वाड्यापासून निघालेल्या मिरवणुकीची सांगता कुमठेकर रस्ता मार्गे टिळक चौकात झाली. उपक्रमाचे यंदा 8 वे वर्ष होते. विशेष मुलांनी हौदात गणपती विसर्जन करुन पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)