विशिष्ट समुहामुळे साहित्यात सामान्यांची दुःखे नजरेआड

कुमार सप्तर्षी यांची उंब्रज येथे त्रिवेणी साहित्य संमेलनात खंत

उंब्रज  (यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी) – साहित्यात शब्द निर्माण करायचे ते एका विशिष्ट समुहाने व नवनवीन शब्द निर्माण करून स्वतःसाठी वापरायचे. इतरांसाठी चुकीचे शब्द वापरले गेले. जातीशिवाय जन्माला येण्याची सोय भारतात नाही. भारतीय म्हणून जन्माला येण्याची सोय आपल्या देशात नसल्याची खंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्‍त केली. तसेच साहित्य एका विशिष्ट समुहाने लिहिल्यामुळे सर्व सामान्यांची दुःखे कशी पुढे येणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला. एकमेकांचे विचार, अनुभव देवाणघेवाण करणे म्हणजे साहित्य होय. अशा साहित्यातून काहीतरी उत्तर सापडते, असेही मत कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उंब्रज ता. कराड येथे आयोजित त्रिवेणी साहित्य संमेलनाच्या समरोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष सुधाकर जाधव, शशिकांत पाटील, कॉ. सयाजी पाटील, सुरेश साळुंखे, सत्त्वशील पाटील, द. श्री. जाधव, उषाताई कांबळे उपस्थित होते.

कुमार सप्तर्षी पुढे म्हणाले, वाचनातून माणूस बौद्धिक श्रीमंत होतो. बौद्धिक श्रीमंती ही चोरली जाऊ शकत नाही. भारत जगातला सर्वात प्राचीन देश आहे. जेव्हा धर्म नव्हता, जात नव्हती तेव्हा हा देश होता. सर्वजण गुण्या-गोविंदाने नांदत होते. साहित्य सर्वांचे नाही ते काही लोकांचे आहे. ज्ञानोबा-तुकारामांपेक्षा मनु श्रेष्ठ होते हे म्हणण्याचे धाडस त्यांचेच राज्य असल्यामुळे त्यांच्यात निर्माण झाले आहे. जे विद्रोही, पुरोगामी असतील त्यांना मारून टाकल्यानंतर लोकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळू नये म्हणून तो राक्षस होता त्याचा वध केला असे सांगायचे अशी या लोकांची संस्कृती आहे.

खरा धर्म-खरे सत्य सांगणाऱ्यांना मारले जात आहे. देवाविरुद्ध बोललात तर गोळी घालून तुझा दाभोळकर करु, कलबुर्गी, पानसरे करु, असे सांगितले जात आहे. सत्य बोलणाऱ्या लोकांचे अस्तित्व हिच आमच्यावर टीका आहे, असे त्यांना वाटते. प्रत्येक जातीच्या मुलावर त्याच्या जातीचे अकारण ओझे असते, जात सोडली तर तुम्ही गरुडा प्रमाणे जगू शकता. जातिमध्ये जगण्याची हमी जी पूर्वी होती ती आज राहिली नाही. जो माणसाला माणसाशी जोडतो त्याला धर्म म्हणतात जो माणसाला माणसापासून तोडतो त्यासाठी जे जे करावे लागते त्याला अधर्म म्हणतात, असे मत कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविक स्वागताध्यक्ष सुधाकर जाधव यांनी केले. शशिकांत पाटील, सुरेश साळुंखे, सत्वशिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. तर आभार कॉ. सयाजीराव पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)