#विवेचन : आजचा अखंड अस्वस्थ महाराष्ट्र… 

अविनाश धर्माधिकारी 

आज महाराष्ट्र जितक्‍या तीव्रपणे अस्वस्थ आहे, असा यापूर्वी कधी होता असं वाटत नाही. इतका तीव्र, अंतःकरण पिळवटून निघावं इतका वेदनादायक, अस्वस्थ तर मला कधी आठवतच नाही. सर्वांनीच जातीपाती विसरून एक नवा समतापूर्ण, समर्थ असा समाज उभा करून भारताला श्रेष्ठत्वाकडे न्यायचं, हे स्वप्न एकेवेळी या महाराष्ट्रानं पाहिलं; देशालाही दाखवलं. आज जाती-वर्गविरहित समाजरचना हास्यास्पद बनून बसल्यासारखी स्थिती आहे. 

नुकताच झालेला 9 ऑगस्ट हा दिवस भारताच्या वाटचालीत “ऑगस्ट क्रांती दिवस’ आहे. 1942 ची “चले जाव’ चळवळ – मार्ग सत्याग्रही असो वा क्रांतिकारक, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, शांततापूर्ण मार्गानं लाठ्या खाल्ल्या पण हटले नाहीत, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. आज महाराष्ट्र जितक्‍या तीव्रपणे अस्वस्थ आहे, असा यापूर्वी कधी होता असं आठवायचं झालं तर तितका तीव्र, अंतःकरण पिळवटून निघावं इतका वेदनादायक, अस्वस्थ तर मला कधी आठवतच नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 1992-93 चं वर्ष आणि तो काळ. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी पाडण्यात आली. देशभर दंगली उसळल्या. त्यापैकी सर्वात भयानक, सर्वात भीषण आणि हिंसक दंगली मुंबईत झाल्या. त्या दंगली एवढ्या भीषण होत्या की त्यामुळं मुंबईचं जनजीवनच कोसळलेलं होतं. दुर्दैवानं त्या दिवसांत शासन नावाची व्यवस्था कोसळल्यात जमा होती.
डिसेंबरच्या मध्याला डोंगरीमध्ये दोन कामगारांना भोसकण्यात आल्याचं निमित्त होऊन दंगली सुरू झाल्या. जरा थांबून महाराष्ट्राचं गाडं रुळावर येतंय असं वाटेपर्यंत परत जानेवारीत भीषण दंगली उसळल्या. त्यांचं निमित्त होतं जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीला लागलेली आग. पाठोपाठ शुक्रवार 13 मार्च 1993 ला मुंबईमध्ये भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले. गुन्हेगारी जगताचा डॉन दाऊद आणि पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय यांनी मिळून हे स्फोट घडवून आणले आहेत हे माहीतच होतं. त्याचवेळी धार्मिक कारणांवरून हत्यांची एक मालिकाही चालू होती.

तेव्हाच विदर्भातला आदिवासी असलेला आपला गोवारी बांधव काही मागण्या घेऊन हिवाळी अधिवेशनामुळं नागपूरला आला. त्या मागण्या काय आहे हे निदान ऐकणं आणि त्याला योग्य उत्तर देण्याऐवजी गोरगरीब, फडक्‍यात भाकरीचा तुकडा बांधून आलेल्या गोवारी बांधवांना भेटायला कुणी जबाबदार नेता समोरसुद्धा आला नाही. उलट पोलीस कारवाई करून तो गोवारी मोर्चा हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रचंड मोठी पळापळ झाली. त्यात शंभरपेक्षा जास्त लोकं चिरडून मेली. त्याचवेळी सर्वात अस्वस्थतेचं, कमालीचं दुःखद प्रतीक मानावं अशी घटना मुंबईत घडली. ती म्हणजे पश्‍चिम मार्गावर कसलीतरी अफवा पसरली म्हणून विशेषतः महिलांनी चालत्या लोकलमधून उड्या मारल्या.

आजच्या महाराष्ट्राकडे पाहताना 1992-93 डोळ्यासमोर येतं तरीही वाटतं की ते सगळं फिकं पडेल इतकी भयंकर तीव्र आणि पिळवटून टाकणारी वेदना व्हावी अशी अस्वस्थता सध्या महाराष्ट्रात आहे. हे 2018 चं वर्षच जणू ती अस्वस्थता घेऊन उजाडलं आहे. एक जानेवारीला कोरेगाव-भीमाच्या युद्धाची 200 वर्षं पूर्ण होण्याच्या निमित्तानं जो मेळावा भरला त्याची परिणती प्रचंड हिंसाचारात झाली. पाठोपाठ 3 जानेवारीचा मुंबई बंद हिंसक बनला. मग काय एल्फिन्स्टनचा पूल कोसळून 29 जण गेले.

मराठा आरक्षणाचा मुद्दाही दीर्घ काळापासून चालू आहे. “आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे आणि ते देण्यासाठी सर्व पावलं टाकू’, हे मुख्यमंत्र्यांनी मांडूनही झालं. आरक्षणाच्या सर्व प्रक्रियेचं कालबद्ध वेळापत्रकही त्यांनी सांगितलं. तरीपण “महाराष्ट्र बंद’ करायचाच आहे! तो बंद शांततेत करण्याचं आवाहन असूनसुद्धा अचानक कुठे कधी कोणता रस्ता अडवला जाईल, तर कुठं बसची जाळपोळ होईल. सगळं सुरळीत चालू असताना अचानक कुठूनतरी मॉब येतो आणि कळंबोली किंवा चाकणला झालेल्या जाळपोळीसारख्या घटना घडतात. तिकडं त्या चेंबूरच्या बीपीसीएल कंपनीच्या एका युनिटला आग लागते आणि त्या आगीच्या ज्वाळांचा धूर मुंबईवर पसरतो. सुदैवानं अग्निशामक दलानं पराक्रम दाखवत वेळीच कामगिरी केल्यानं ती आग पसरायची थांबली. पेट्रोलचे महाप्रचंड साठे जवळ होते, केमिकलच्या कंपन्या त्या परिसरात आहेत. भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरही तिकडंच आहे. क्षणाक्षणाला जाणीव व्हावी की केवढ्या भीषण ज्वालामुखीवर आपण बसलेलो आहोत.

इतकं अस्वस्थ, अनिश्‍चित, असुरक्षित वातावरण असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांना संपासाठी बरोबर हेच तीन दिवस सापडले! आज राज्याचं वातावरण काय आहे, लोक काय सोसत आहेत, याचा शासनातील जबाबदार कर्मचाऱ्यांनासुद्धा विचार करावासा वाटला नाही. जानेवारीपासून सातवा वेतन आयोग सुरू करतो, असं सरकारनं सांगूनही आम्ही तीन दिवस संप करणारच. आमच्या मागण्या काय? तर पाच दिवसांचा आठवडा पाहिजे. (त्या पाच दिवसांत कामं नीट करू, असं ते म्हणत असल्याचं कुठं दिसून येत नाही. सरकार दरबारी लोकांची दैना आहे. पन्नास खेटे मारल्याशिवाय कामं होत नाहीत. कामाच्या वेळेत माणसं सापडत नाहीत. पण आठवडा पाच दिवसांचा पाहिजे!) शिवाय निवृत्तीचं वय साठ करा. तरुणांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची समस्या गंभीर असताना ही मागणी त्यांच्या पोटावर पाय आणणारी आहे.
बदल करायचेच झाले तर निवृत्तीचं वय खाली आणायला हवं. (तो गुंतागुंतीचा, प्रशासकीय प्रश्न आहे त्याविषयी वेगळं स्वतंत्रपणे लिहीन.) पण मला कळणाऱ्या आयुष्यात इतका असमर्थनीय दुसरा संप मला काही आठवत नाही. त्या संपाला पाठिंबा म्हणून इतर अनेक संघटनांचा संप.

या सगळ्यात चालणाऱ्या पावसात सालाबादप्रमाणं बघावं तेव्हा जनजीवन ठप्प. दुष्काळात नुसता तेरावा नाही… चौदावा…पंधरावा… सोळावा महिना! तेच रस्ते, तिथंच दरवर्षी पाणी साचतं. त्याच पनवेल महामार्गाला, त्याच जागी दरवर्षी खड्डे पडतात. ते भरले जातात. ते भरण्याचं कॉन्ट्रॅक्‍ट त्याच कंत्राटदारांना मिळतं. खड्ड्यांमुळं त्यांच्यावर कधी कारवाई झाल्याचं माहिती नाही. कॉन्ट्रॅक्‍टर, बिल्डर, सरकार यांच्या मिलीभगतीत लोकांच्या आयुष्याची दैना आहे.
हे सगळं होत असताना एक विशीतला तरुण मेजर राणे दहशतवाद्यांशी लढताना आपले प्राण अर्पण करतो. आई-वडलांच्या वयात आलेल्या मुलाला बघता-बघता वीरमरण येतं. त्याच वेळी मुंबईचा शेअर बाजार अभूतपूर्व अशी उसळी घेऊन 38000 चा टप्पा पार करतो.

एकाच वेळी महाराष्ट्रात ही प्रचंड राजकीय, सामाजिक अस्वस्थता, तिच्यामुळं होणारं हजारो कोटी रुपयांचं नुकसान आणि त्याचवेळी मुंबई शेअर बाजाराची 38000 ची उंची यावर जाणकार जेवढा विचार करतील तेवढा त्यातून अतिशय अस्वस्थ अर्थच समोर येणार आहे. जो महाराष्ट्र प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व करत होता, जो देशाला दिशा दाखवत होता, ज्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात जातीचा उच्चार करणं किंवा दुसऱ्याला त्याची जात विचारणं हे असभ्य आणि असंस्कृपणाचं लक्षण मानलं जायचं त्या महाराष्ट्राची सामाजिक परिभाषा बघताबघता जातीवर आधारित बनली आहे. आता असभ्यपणा राहिला दूर, उलट निर्णयाचे, विचाराचे, समोरच्याशी माणूस म्हणून मी काय संबंध ठेवायचे निकष जातीवरून ठरायला लागले.

सर्वांनीच जातीपाती विसरून एक नवा समतापूर्ण, समर्थ असा समाज उभा करून भारताला श्रेष्ठत्वाकडे न्यायचं हे स्वप्न एकेवेळी या महाराष्ट्रानं पाहिलं आणि ते देशालाही दाखवलं. आजच्या तारखेला जाती-वर्गविरहित समाजरचना हास्यास्पद बनून बसल्यासारखी स्थिती आहे. इतका तीव्र, वेदना पिळवटून निघेल असा अस्वस्थ महाराष्ट्र माझ्यातरी आठवणीत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)