विविध रंगी साड्यांमध्ये खुलला “देस मेरा रंगिला’

पिंपरी – कुणी बारा बलुतेदारांची मक्तेदारी, तर कुणी गुजराती, मारवाडी चोली-घागरा पेश केला, कुणी कोकणी काष्टा, मालवणी कोळीण सादर केली, तर कुणी ठसकेबाज नऊवारी अन्‌ बेळगावी इरकलचा पदर उडविला, कुणी पांरपारिक सासू, तर कुणी आधुनिक सून मांडली…मग काय, विविधरंगी-ढंगी साड्यांमध्ये अख्खा “देस मेरा रंगिला’च दिसला.

निमित्त होते “रंग माझा साडीत वेगळा’ या उपक्रमाचे. चिंचवडमधील क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती, महिला विभागातर्फे या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या उपाध्यक्षा शकुंतला बन्सल, शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे, विनया तापकीर, रंजना नवले, मुख्याध्यापिका वासंती तिकोने, सविता गावडे, नूतन चव्हाण, रांगोळी कलाकार अंजली मेंनकुदळे आदींनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. सहभागी स्पर्धकांनी पारंपारिक, राज्यनिहाय, विश्वनिहाय, महाराष्ट्रीयन साड्यांचे प्रकार सादर केले.

-Ads-

साडी नेसलेलीच, हवी शिवलेली नको ही महत्त्वपूर्ण अट होती. विविध राज्यातील नववधूंच्या साड्या खास आकर्षण ठरले. हिंदूस्थानी साडी पाश्‍चिमात्य पेहरावातही कशी नेसता येते, हे तालवृंद गटाने दाखवून दिले. नांदा सौख्य भरे गटाने सासूची पारंपारिक अन्‌ सुनेची आधुनिक साडी पेहराव केली होती. तरीही स्टेजवर आलेल्या सासू-सुनांपैंकी सासूच भाव खावून गेल्या. “एराज्‌ ऑफ बॉलिवूड थीम’द्वारे स्पर्धकांनी चित्रपट सृष्टीचा जुना कालखंडच उलगडून दाखवला. डायमंड गटाच्या प्लेन साड्यांच्या विविध प्रकारांनी रसिक अचंबितच झाले. रक्षा गटाने आजेसासू ते नातसून अशी एकत्र कुटुंब पद्धतीचा उत्कृष्ट नमुनाच पेश केला. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोदिनी बकरे यांनी आभार मानले.

सागरिका गटाने पटकावले बक्षीस
नाविन्या गटातर्फे मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिकांनी प्रत्येक राज्यानुसार साड्यांचे प्रकार परिधान केले होते. पारंपारिक साड्यांचे आधुनिक रुप सादर करणाऱ्या सागरिका गटाने प्रथम, महाराष्ट्रातील बुलुतेदार स्त्रियांचा पेहराव केलेल्या आनंदवन ग्रुपने द्वितीय, तालवृंद गटाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ कोहिनूर गटाला गौरविण्यात आले. कल्पना भोईर, अमोल रोडे, रूपाली देव, चैताली भोईर, चंद्रकला शेडगे आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. सुनिता शिंदे यांनी प्रेक्षक महिलांसाठी प्रश्न मंजुषेचे आयोजन केले. विजया मानमोडे, मिनल ठिपसे आणि मेघा म्हेत्रे यांनी परीक्षण केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)