विविध प्रकरणांनी पुणे न्यायालय प्रकाशझोतात

– “डीएसके’, कोरेगांव भीमा, माओवादी संबंध प्रकरणांची सुनावणी
विजयकुमार कुलकर्णी

पुणे – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांनी केलेल्या गुंतवणूकदाराच्या फसवणूक प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. प्रथम सत्र, त्यानंतर उच्च, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला जामिनानंतर डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुलगा शिरीषसह विविध नातेवाईक, अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये 6 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची 2300 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात नियम डावलून डीएसके यांना कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. यावरून खळबळ झाली होती. हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले होते. त्यामध्ये सबळ पुरावे नसल्याने तिघांना दोषमुक्त करण्याचा अर्ज पोलिसांनी न्यायालयात केला आहे. याला गुंतवणूकदारांनी विरोध केला आहे. यावर सुनावणी होणार आहे.

बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून पोलिसांनी कारवाई करत सुरूवातीला रोना विल्सन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, प्रा.शोमा सेन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर आणि भूमिगत असलेल्या पाच जणांवर 5 हजारहून अधिक पानाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचे यातून समोर आले होते. त्यामुळे संपूर्ण देशात हे प्रकरण चर्चेत राहिले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात पंतप्रधान यांच्या हत्येचा कट केल्याचे आणि लोकशाही शासन व्यवस्था आणि नागरिक यांच्याविरोधात युद्ध पुकारण्यासाठी अवैध हत्यारे आणि दारूगोळा मिळविण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी राज्यासह परराज्यांत कारवाई करत पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत वरवरा राव, अरुण फरेरा, वरनॉन गोन्झालवीस, सुद्धा भारद्ववाज यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता.तर, दुसरीकडे कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली. सुरूवातीला पोलीस कोठडी, नंतर न्यायालयीन कोठडी त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांनी आता जामिनाच्या अटी शिथिल करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी होणार आहे.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात नवीन “थिअरी’
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून राहिलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात घडामोडी घडल्या. शरद कळसकर, सचिन अंदुरे, राजेश बंगेरा, अमित दिगवेकर, अमोल काळे या पाच जणांना सीबीआयने अटक केली. खुनाच्या गुन्ह्याची नवीन “थिअरी’ मांडली. या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. आता या कायद्यात बेकायदेशीर प्रतिबंधक कायदा (यूएपीए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलिसांनी मुदतवाढ देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)