#विविधा: श्रावण-श्रावणबाळ आणि कावडिये 

अश्‍विनी महामुनी 
श्रावण महिना आता संपत आला आला आहे. श्रावण महिना सुरू झाला की अनेक गोष्टींची आठवण येते. हा व्रतांचा, उत्सवांचा,सणांचा पवित्र महिना. श्रावण म्हटले की प्रथम आठवते बालकवींची
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते शिरशिर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे….
ही कविता. या कवितेने शतकाहूनही अधिक काळ रसिकमनावर मोहिनी घातलेली आहे. आजही श्रावणमासी हर्ष मानसी तशीच ताजी टवटवीत्‌ वाटते. निसर्गाचा श्रावण बदलला, त्याची मोहिनी, टवटवीतपणा कमी झाला, शहरात तर श्रावण आल्याचे सांगावे लागते. तो शोधावा लागतो. बालकवींच्या कवितेतला श्रवण मात्र तसाच ाअहे, ताजा, तजेलदार….पण मला माझे आजोबा म्हणत ती एक दुसरी एक कविता आठवते. अगदी झपाटून टाकणारी-
शर आला तो धावूनी आला काळ विव्हळला श्रावण बाळ….
हा! आई गे दीर्घ फोडुनी हाक तो पडला जाऊनी झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी हृदयाचे झाले पाणी
ही ग, ह . पाटलांची हृदयाला भिडणारी कविता. माझ्या आजोबांच्या-त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, कापऱ्या आवाजात ती मी अनेकदा ऐकली. मला खांद्यावर घेऊन थोपटत ते अनेकदा ही कविता म्हणायचे.
मम म्हातारे मायबाप तान्हेले तरुखाली असतील बसले
कावड त्यांची घेऊनी मी काशीला चाललो तीर्थयात्रेला ….
अशा काही ओळी म्हणताना तर म्हणताना त्यांचा कांपरा आवाज आणखीनच कापरा व्हायचा. मला ते जाणवायचे. लहानपणी मला त्या कवितेचा अर्थ फारसा कळत नसे, पण समजायला लागल्यावर मात्र अतिशय गेय अशा त्या कवितेने माझ्या मनाचा कब्जा घेतला. आजही ही कविता माझ्या संग्रही आहे. कधी ती वाचायला लागले की आजोबांचा आवाज माझ्या कानात घुमू लागतो. तो उरात बाण लागलेला श्रावणबाळ, राजा दशरथ आणि श्रावणबाळाचे “तरुखाली” बसलेले म्हातारे, अंध मायबाप तान्हेले डोळ्यासमोर दिसू लागतात. श्रावणबाळ आपल्या मातापित्यांना कावडीत बसवून काशीला तीर्थयात्रेला जात होता.
ती कावडही दिसू लागते.
आजकाल आपल्याकडे कावड हा प्रकार दिसणे दूरच, पण कावड हा शब्दही कुठे वाचनातही येत नाही. पण उत्तर भारतात मात्र कावड आणि कावडिये ही मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. श्रावण महिना सुरू झाला की कावडियांच्या बातम्या येऊ लागतात वृत्तपत्रांत, टीव्हीवर.
कावडिये म्हणजे गंगेचे पाणी घेऊन त्याने शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी जाणारे भक्तजन. श्रावणी शिवरात्रीला केलेल्या अभिषेकाचे महत्त्व फार मोठे आहे. म्हणून प्रचंड संख्येने कावडिये गंगाजल घेऊन हरिद्वारला जात असतात. हृषिकेशपासून ते हरिद्वारपर्यंत ते कावडीने गंगाजल घेऊन जातात. अगदी मोठ्या संख्येने. ज्यिांना हे शक्‍य नाही, ते ते कावडीत गंगाजल घेऊन आपापल्या गावी येतात आंणि गावातील महादेवाला अभिषेक करतात.
आपल्याकडे वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे लोक मार्गात ठिकठिकाणी व्यवस्था करतात, तशी तिकडे कावडियांसाठी करतात.
कावडियांची परंपरा फर जुनी आहे. परशुरामाने कावडीने गंगाजल नेऊन शंकराला अभिषेक केला होता, आणि तेव्हापासून कावड नेण्याची सुरुवात झाली असे सांगितले जाते. भगवान शिवाने हलाहल प्राशन केल्यानंतर त्यांच्या शरीराची आग होऊ लागली. तेव्हा ती शांत करण्यासाठी देवांनी गंगाजलाने त्यांच्यावर अभिषेक केला. तेव्हापासून शंकराला कावडीने जलाभिषेक करण्याची पद्धत सुरू झाली अशीही एक कथा आहे. रावणाने कावडीने गंगाजल नेऊन शंकराला अभिषेक केला होता अशीही एक कथा आहे.
हे कावडीये एकट्याने कावड नेतात, तशी रिले रेससारखी साखळी पद्धतीनेही नेतात, तिला डाक कावड असे म्हणतात. हे सारे अंतर धावत पार करणारे कावडिये असतात.
हे सारे आठवले श्रावणबाळ कवितेने. या कवितेतील शेवटच्या काही ओळी म्हणताना आणि ऐकताना कंठ दाटून आल्याविना राहत नाही. मग पुढची ओळ म्हणणेही कठीण होऊन बसते.
आहेत अंध ते दोन्ही दुर्वाता फोडू नका ही
ही विनंती तुमच्या पायी
मज माघारी करा तुम्ही सांभाळ होऊनिया श्रावणबाळ्‌….खरंच आजकाळ श्रावणबाळही राहिले नाहीत, तर श्रावणबाऴ होऊन सांभाऴ करणारे कोठून असणार?

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)