माधव विद्वांस
कादंबरी लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार रवींद्र सदाशिव भट यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1939 रोजी झाला व 22 नोव्हेंबर 2008 रोजी निधन झाले. सातारा जिल्ह्यातील वाईतील भट कुटुंब म्हणजे वाईच्या सार्वजनिक राजकीय क्षेत्रातील अग्रणी कुटुंब मानले जाते. उंच, गोरेपान, ताठ मानेने चालणारे अप्पासाहेब तथा सदाशिवराव भट वाईतील प्रतिष्ठित वकील. त्यांची मुलेही तशीच वाईच्या सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा मिळवून राहिली होती.
रविन्द्रजी सृजनशील असे प्रसिद्धपराङमुख व्यक्तिमत्व होते. पण प्रसिद्धी त्यांच्या मागे होती ती त्यांच्या प्रतिभेमुळेच. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले होते. पुणे आकाशवाणीवर 12 वर्षे त्यांनी काम केले होते. त्यांनी एकूण 14 कादंबऱ्या, पाच नाटके, सहा काव्यसंग्रह व चित्रपटकथा, बालवाङ्मय असे लेखन केले. मराठी संत त्यांचे चरित्र व साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांची कर्मभूमी पुणे असली तरी वाईतील कार्यक्रमास त्यांची प्रथम पसंती असायची.
वाई येथे बालपण गेले असल्यामुळे त्यांचेवर कृष्णेचा प्रभाव मातृवत होता. लहान मुलांसाठी संतांची सोप्या भाषेत त्यांनी चरित्र लिहिली. त्यांची अनेक गीते आजही लोकांच्या ओठावर आहेत, पण ती त्यांनी लिहिली आहेत हे बहुतांश रसिकांना माहीत नाही.
“दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती…’ हे आशाताईनी गायलेले गीत गीतकार रवींद्र भट यांचेच आहे. “उठा राष्ट्रवीर हो’ हे सुधीर फडके यांनी गायलेले “हा माझा मार्ग एकला’ चित्रपटातील समूहगीत त्यांनीच लिहिले होते. त्यांनी “ते माझे घर’ या चित्रपटाची निर्मिती केली तो चित्रपट त्यांना आर्थिक संकटात घेऊन गेला. त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही, पण चित्रपटातील गाणी मात्र आजही लोकांच्या ओठावर आहेत.
त्यांची पत्नी कुमुद याही गायिका आहेत. त्यांची त्यांना कार्यक्रमामध्ये साथ असायची दोघांनी मिळून “इंद्रायणी काठी’चे दीड हजारचेवर प्रयोग केले होते. “उठि श्रीरामा पहाट झाली’ हे “ते माझे घर’ या चित्रपटातील सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले आशाताईंनी गायलेले गीत आजही लोकप्रिय आहे. “अरे संसार संसार’, “केल्याने होत आहे रे’, “अवघी दुमदुमली पंढरी’, “असा नवरा नको गं बाई’, “एक कळी फुललीच नाही…’ अशी सुंदर नाटकेही त्यांचे नावावर आहेत. ज्ञानेश्वरी निरुपणकार रवींद्राना अभिवादन.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा