विविधा: युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर 

माधव विद्वांस 

वर्तमानातील घटनांचा मनावर परिणाम होऊन कविता करणारे प्रयोगशील आधुनिक कवी बा. सी. मर्ढेकर यांची आज जयंती.त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील फैझपूर येथे 1 डिसेंबर 1909 रोजी झाला तर निधन 20 मार्च 1956 रोजी दिल्ली येथे झाले. त्यांच्या “सौंदर्य आणि साहित्य’ या ग्रंथाला वर्ष 1956 चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांचे साताऱ्याजवळील कृष्णा नदीच्या काठावरील मर्ढे हे मूळ गाव. त्यांचे पूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असे होते. त्यांचे मूळ आडनाव गोसावी असे होते, पण मर्ढे हे त्यांचे गाव म्हणून त्यांनी मर्ढेकर असे नाव लावले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर यथे झाले तर माध्यमिक शिक्षण फैझपूर व धुळे येथे झाले. ते पुण्याचा फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाले. वर्ष 1929 मध्ये प्रशासकीय सेवेचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले; पण त्यात त्यांना यश आले नाही.याच कालावधीमध्ये त्यांनी पाश्‍चिमात्य साहित्याचा अभ्यास केला. वर्ष 1932 मधे मायदेशी परत आल्यावर एका इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले. त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून चर्चगेटजवळील सीडनहॅम कॉलेज तसेच एलफिन्स्टन, इस्माईल युसूफ अशा महाविद्यालयाबरोबरच धारवाड आणि अहमदाबाद इथल्या सरकारी महाविद्यालयांतही सुमारे तीन वर्षे अध्यापनाचे काम केले. पण अध्यापन क्षेत्रात ते रमले नाहीत. त्यांचे महाविद्यालयातील हितचिंतक हॅमिल यांना या गुणी विद्वानाची होत असलेली परवड पाहून खंत वाटत होती.

आपण त्यांचे साठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून ऑल इंडिया रेडिओचे प्रमुख कंट्रोलर लायोनल फिल्डन यांच्याकडे मर्ढेकरांची शिफारस केली. त्यांनीही मर्ढेकरांचे गुण पारखून त्यांना आकाशवाणीवर संधी दिली. त्यांचे Arts and Man हे पुस्तक इंग्लंडमधील एका प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाले होते. त्यांचा Basic English हा प्रदीर्घ लेख आणि त्यांनी एल्फिन्स्टोनियनच्या अंकात लिहिलेले लेख व त्यांच्या काही मराठी कविता, पाहून लायोनल फिल्डन प्रभावित झाले होते. त्यांनी वर्ष 1938 ते 1956 असा 18 वर्षांचा कालावधी दिल्ली येथे आकाशवाणीवरील अधिकारी म्हणून आयुष्याच्या अखेरपर्यंत व्यतीत केला. त्यांच्या “किती तरी दिवसांत’ या कवितेतून त्यांना येणारी कृष्णाकाठच्या मर्ढे गावाची ओढ दिसून येते. त्यांच्या “पिपांत मेले ओल्या उंदिर’ या कवितेतून वास्तवता व त्यातून येणारे वैफल्य जाणवते. त्यांचा गणपत वाणी आता या बझारच्या युगात दिसणार नाही. पण त्या तत्कालीन वाण्याची मानसिकता मात्र त्यांनी सुंदर रंगविली आहे.

मर्ढेकरांनी काही कादंबऱ्या, नाटके, तसेच ललित लेखनही ही केले. तसेच त्यांचे तीन कवितासंग्रह पण प्रसिद्ध झाले आहेत. मर्ढे गावातील मर्ढेकरांच्या प्रस्तावित स्मारकाचे लोकार्पण व्हावे यासाठी सातारकर साहित्यिक प्रदीर्घ लढा देत आहेत. मात्र, आजही हे स्मारक प्रलंबितच आहे. हे स्मारक लवकर पूर्ण व्हावे हीच त्यांना श्रद्धांजली होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)