#विविधा: मोहम्मद उमर अली मुक्री 

माधव विद्वांस 
आज 4 सप्टेंबर म्हणजे मिठागरातील मिठा माणूस, मुक्री याचा आज स्मृतिदिन. हास्याचे कारंजे उडविणारे मुक्री यांचे संपूर्ण नाव मोहम्मद उमर अली मुक्री. त्यांचा जन्म उरण येथे 5 जानेवारी 1922 रोजी झाला.
मुक्री यांच्या वडिलांची मिठागरे होती. समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांप्रमाणे मुक्री खोडकर होते, तर कधी शांत भासणाऱ्या अथांग दर्याप्रमाणे धीरगंभीर होते. मुक्री शिक्षणात कधी रमले नाहीतच. त्याकाळी गल्लीबोळातील सिनेमे पाहून त्यांना सिनेमाचे आकर्षण वाटू लागले होते. वडिलांची नजर चुकवून ते चित्रपट पाहात.त्यासाठी त्यांना वडिलांचा मारही खावा लागला. त्यांचे शाळेत लक्ष नसल्याने अखेर वडिलांनी त्यांना चुलत्याकडे मुंबईला शिक्षणासाठी पाठविले. तेथील वातावरणाने त्यांचे सिनेमाचे वेड अधिकच वाढले. तेथे अंजुमन इस्लाम स्कूलमध्ये अभिनेते दिलीपकुमार यांची ओळख झाली. तेथे त्यांच्याबरोबर नाटकातही काम केले; तसेच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत काम करण्याची सुरुवात केली.
सिनेमाची मुक्री यांना एवढी ओढ होती की, एक दिवस चक्‍क खोटे बोलून “मला गाणे येते’ असे सांगून सरोज मुव्हिटोनच्या सेटवर गेले व गाणे गाऊ लागले. आपल्या भसाड्या आवाजात गाणे गात असताना त्यांनी केलेले हावभाव पाहून सर्वांची करमणूक झाली व त्यांना विनोदी नट म्हणून तेथे नोकरी देण्यात आली व चंदेरी दुनियेत त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्या बुटक्‍या, तांबुस गौरवर्ण, गोबरा चेहरा व चेहऱ्यावरील मिस्कील भाव यामुळे व त्यांच्या स्वभावातील विनोदीपणामुळे त्यांची एक खास जागा निर्माण झाली.
सन 1945 मधे बॉम्बे टॉकीजच्या पॅडी जयराज यांनी दिग्दर्शित केलेल्या “प्रतिमा’ या चित्रपटात दिलीपकुमार बरोबर त्यांना पहिली भूमिका मिळाली.त्यावेळी देविकाराणीने त्यांच्यातील गुण ओळखून “प्रतिमा’ चित्रपटात घेतले. मुक्री यांनी 60 वर्षाच्या अभिनयाच्या कारकिर्दीत 600 हून अधिक चित्रपटात प्रामुख्याने विनोदी भूमिका केल्या. काही वेळा त्यांनी चरित्र अभिनेता म्हणूनही अभिनय केला. सहज नैसर्गिक अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य्‌. दिलीपकुमारबरोबर त्यांचे अनेक चित्रपट झाले त्यांची एकप्रकारे जोडीचं जमली होती. राजकपूरच्या “चोरी चोरी’मध्ये नर्गिस, मास्टर भगवान डेव्हिड, जॉनी वॉकर यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. “शराबी’तील अमिताभच्या “मुच्छे हो तो नथुलाल जैसी वरना ना हो,’ या प्रशंसेमुळे मुक्री नथुलाल म्हणून प्रसिद्ध झाले. दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी, मेहबूब खान, राज खोसला, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाईंसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले.
राजकपूर, दिलीपकुमार, देव आनंद, सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार, अभिताभ बच्चन यांच्याबरोबर मुक्री यांनी काम केले. “कोहिनूर’, “आन’, “अमर’, “अनोखा प्यार’, “राम और श्‍याम’ या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत त्यांनी काम केले. दिनांक 4 सप्टेंबर 2000 रोजी त्यांचे निधन झाले. हिंदी सिनेसृष्टीतील विनोदाच्या या बादशहाला विनम्र अभिवादन.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)