#विविधा: मैत्र जिवाचे

अश्‍विनी महामुनी 

मागील रविवार हा एक खास दिवस होता. तसा प्रत्येक रविवार खास असतो. सुट्टीचा दिवस म्हणून. कोणासाठी तो आरामाचा दिवस असतो, तर कोणासाठी आठवडाभराची घरची साठलेली कामे उरकण्याचा दिवस असतो. खासकरून नोकरी करणाऱ्या महिला वर्गाला तर रविवारी कमालीच काम असते. परत कुटुंबातील सर्वच मंडळी घरी असल्याने आणि प्रत्येकजण आठवडाभर काम करून दमलेला असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याच्या फर्माईशी पुरवाव्या लागतात. आठवडाभराचे कपडे पडलेले असतात, घराची साफसफाई करायची असते आणि कोणीतरी सहकुटुंब सहपरिवार रविवारीच भेटायला येऊन टपकते. मग त्यात आपले मात्र सारे कार्यक्रम विस्कटून जातात. पण त्याला इलाज नसतो. नाइलाज को क्‍या इलाज म्हणायचे आणि सुट्टीची वाढलेली कामे करत बसायचे.

आपण सोडून बाकी सारेच आठवडाभर काम करून दमलेले असतात. आणि ते दमले पण हा ऽऽऽश्‍श्‍श्‍श हु श्‍श्‍श करत दाखवत असतात्‌. गृहिणीला ती सवलत नसते. तिला दुप्पट काम दुप्पट उत्साहाने करायचे असते. दर रविवारी. तेव्हा पंडित नेहरू म्हणायचे, तसे चेंज इन वर्क इज रेस्ट म्हणजे कामातील बदल म्हणजे विश्रांती हे तिच्या बाबतीत खरे ठरते. अगदी शंभर टक्के!
तर गोष्ट होती गेल्या रविवारची. ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप दिवस-मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो. पाळला जातो असे म्हणायचे नाही. साजरा केला जातो. कारण या दिवशी काही मित्रमंडळी मुद्दाम एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदाने घालवतात असे फारसे होत नाही. किंवा भेटता आले नाही, तरी फोन करून जिवाभावाच्या गप्पा मारणे होत नाही. त्याऐवजी मोबाईलवरूनच डझनावारी मित्रांना मैत्रीदिनाचे संदेश, फोटो, कविता, कार्टून एकमेकाला पाठवतात. एकाने पाठवलेला मेसेज सगळीकडे फिरून पुन्हा मूळ जागी आल्याचे अनेकदा दिसून येतो. यात पृथ्वी गोल असल्याचा अनुभव येतो.
तसे पाहिले तर शालेय जीवनातील मैत्री ही खरी निर्व्याज कोणताही हिशेब नसलेली मैत्री असते. त्यावेळचा एकत्र खेळण्याचा, बागडण्याचा बालिश आनंद पुढे मिळत नाही. पुढील आयुष्यातील प्रत्येक आनंदाला कळत नकळ्त कोठेतरी हिशेबाची किनार लागलेली असते. वेळकाळाचे बंधन असते. वाढत्या जबाबदाऱ्यांचे ओझे असते. मध्यंतरीच्या काळात फ्रेंडशिप बॅंडचे फॅड आले होते. मनगटात घालायचे वेगवेगळ्या प्रकारचे बॅंड-रबराचे-प्लॅस्टिकचे-धातूचे-सोन्याचांदीचे विक्रीला यायचे आणि त्यांची तडाखेबंद विक्रीही व्हायची. शाळा-कॉलेजातील मुलांच्या हातात तेव्हा एकापेक्षा अनेक फ्रेंडशिप बॅंड दिसायचे आणि दुसऱ्या दिवशी काढून टाकले जायचे. मात्र, त्या एका दिवसासाठी व्यापाऱ्यांची चांदी व्हायची. बरे, या फ्रेंडशिप बॅंडमध्येही चिनी फ्रेंडशिप बॅंड मोठ्या प्रमाणावर असायचे. एक मेसेज मला फार भावला होता,
आपली मैत्री व्यक्‍त करणं मला रोज जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुझ्या विना रमत नाही. खरंच आहे. खऱ्या मैत्रीला अशी शब्दांत पकडण्याची आवश्‍यकताच नसती. मैत्री म्हणजे काय एखादा विजेत्याचा करंडक आहे, की ज्याचे प्रदर्शन करावे, की पाहा हा मी जिंकून आणला आहे. मैत्री फक्‍त या हृदयाची त्या हृदयाला समजली की झाले, इतरांशी काय देणे घेणे.
मी कोठेतरी एक गोष्ट वाचली होती. एका मुलाला मोठा अभिमान होता की मला खूप मित्र आहेत. त्याच्या वडिलांनी सांगितले, की चल तुझ्या मित्रांची परीक्षा घेऊ. त्याला घेऊन ते त्याच्या सर्वात जिवलग समजल्या जाणाऱ्या मित्राकडे रात्रीच्या वेळी गेले. त्याला म्हणाले, याच्या हातून एक मोठा गुन्हा घडला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत. याला तुझ्या घरात आठवडाभर ठेवून घे.
गुन्हा-पोलीस-मागावर हे ऐकताच त्या मित्राचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याने काही न बोलता दार लावून घेतले. यांना आत या सुद्धा म्हणाला नाही. मुलाचा चेहराही एकदम पडला. हाच अनुभव सर्व मित्रांकडे आला. आता वडिलांनी विचारले, सांग तुझे खरे मित्र किती आहेत. ” ए फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन्डिड’ असे शाळेत पाचवी-सहावीत असतानाच शिकलो होतो आपण. पण ते जाणून घेतले नाही. आपले परिचित खूप असतात, पण मित्र किती असतात हे आपल्याला कळत नाही. ते या फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने कळले तर फ्रेंडशिप डे सार्थकी लागेल.
माझी एक वर्गमैत्रीण मीनाज. तिने एका पत्रात लिहिले होते- रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही. मैत्री ना सजवायची असते, ना गाजवायची असते, ती तर नुसती रुजवायची असते, मैत्रीत ना जीव द्यायचा असतो, ना जीव घ्यायचा असतो, इथे फक्त जीव लावायचा असतो.
What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)