विविधा: माधव ज्युलियन 

माधव विद्वांस 

सहृदयी कवी, आद्य मराठी गझलकार, उर्दूचे अभ्यासक कविवर्य माधव त्र्यंबक पटवर्धन अर्थात माधव ज्युलियन्‌ यांचे आज पुण्यस्मरण. जन्म 21 जानेवारी 1894, निधन 29 नोव्हेंबर 1939. त्यांचा जन्म बडोदा येथे आजोळी झाला. ते पुणे जिल्ह्यातील आवळस गावचे तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक इंग्रजी शिक्षण त्यांनी बडोदे, अहमदाबाद आणि मुंबई येथे पूर्ण केले. बडोदा येथील वास्तव्यातच त्यांच्या काव्य लेखनाला सुरुवात झाली होती. बडोदा संस्थानाचे राजकवी कवी चंद्रशेखर यांचा सहवास त्यांना लाभला. ते छंद : शास्त्राचे व्यासंगी व मराठी भाषाशुद्धीबाबत आग्रही होते. प्रयोगशीलता त्यांच्या काव्यातून दिसून जरी येत असली तरी भावपूर्ण कविताही त्यांनी रचल्या. त्यांच्या कवितेमध्ये मराठी भाषेबद्दल जिव्हाळा दिसून येतो. “मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे…’ या कवितेतून भाषेवर झालेल्या अन्यायाची खंत दिसून येते, तसेच मराठीबद्दलचा अभिमानही प्रदर्शित होतो. हे गीत पंडितराव नगरकर व ज्योत्स्ना भोळे यांनी गायले आहे व त्याला मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केले होते.

“कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी’ या बालगीतातून त्यावेळच्या आगीनगाडीचे सुरेख वर्णन केले आहे. काव्यनिर्मितीप्रमाणेच माधवरावांनी काव्यसमीक्षा आणि काव्यविचारही केला. माधव ज्युलियन त्यांच्या “प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई…’ या गीताने अजरामर झाले. आईच्या विरहाचे ह्रदयस्पर्शी गीत ऐकताना डोळ्यांच्या कडा ओलावतात. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेले, लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आज रसिकांच्या ओठावर कायमस्वरूपी कोरले आहे. आधुनिक मराठी कवी आणि कविता ह्यावर समीक्षात्मक लेखन त्यांनी केले व त्यातील उणिवाही त्यांनी अधीरेखित केल्या. या संबंधी इंग्रजी भाषेतूनही लेखन केले. चिकित्सा कशी असावी तसेच रसग्रहण कसे असावे यावरही सुस्पष्ट मते त्यांनी मांडली आहेत. त्यासाठी त्यांनी ‘काव्यचिकित्सा’ ही लेखमालाही लिहिली. रसग्रहण आणि वाङ्‌मयमीमांसा ह्या विषयांवरही त्यांनी लेखन केले.

काव्यविहार (1947) व काव्यचिकित्सा (1964) या त्यांच्या कविकाव्यविषयक लेखसंग्रहातून मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. बडोदा येथे 1916 मध्ये बी. ए. झाल्यानंतर बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई हायस्कूलमध्ये काही काळ त्यानी अध्यापन केले. पुढे वर्ष 1918 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून फार्सी आणि इंग्रजी हे विषय घेऊन ते एम्‌. ए. झाले. त्यानंतर पुणे येथे डेक्कन एजुकेशन सोसायटीच्या शाळा व कॉलेजमध्ये अध्यापन केले. जून 1918 ते ऑक्‍टोबर 1925 ह्या कालखंडात पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल’ आणि फर्ग्युसन कॉलेज’ ह्या शिक्षण संस्थांतून त्यांनी अध्यापन केले. ते संस्थेचे आजीव सदस्यही होते. कविवर्यांना अभिवादन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)