#विविधा: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार 

माधव विद्वांस 
इतिहास संशोधक महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे आज पुण्यस्मरण (जन्म 5-8-1890 निधन-6-10-1979). त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यात बिरवाडी येथे झाला. पोतदारांच्या मूळ आडनाव ओर्पे असे होते. आदिलशाहीत त्यांचे एक पूर्वज खजिन्याचे अधिकारी म्हणजे पोतदार या पदी नेमले गेले. तेव्हापासून पोतदार हे नाव रूढ झाले.
पोतदारांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. सन 1910 मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाल्यावर, त्यांनी न्यू पूना कॉलेजमध्ये (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. ते स्वतः पर्शियन भाषा व मोडी लिपी जाणत होते. त्यामुळे त्यांना इतिहास संशोधनात फायदा झाला. त्यांचा इतिहासाचा व्यासंग मोठा होता.
प्रस्तुत लेखक वाई येथे गंगापुरीत कीर्तनकार पटवर्धनांचे घरात राहात असताना समोरील घर पोतदार यांनी शांतता लाभेल म्हणून वास्तव्यासाठी विकत घेतले होते. पण त्यांचे फारच अल्पकाळ वास्तव्य झाले, तरीही त्यामुळे त्यांचेशी बोलण्याची बघण्याची लेखकाला संधी मिळाली. मिस्कील पण फटकळ स्वभावाचे ते होते. ते नेहमी पुणेरी पगडी घालत. हल्ली पगडी फक्‍त नाटकातच आणि पुण्यातील समारंभात चर्चेतच जास्त असते. पोतदार हे इतिहास जगले. त्यांच्या ध्यानीमनी आणि लेखणीमध्ये फक्‍त इतिहास असायचा. त्यांनी अनेक व्याख्याने दिली. अहमदनगर येथे 1939 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सन 1918ते 1947 ह्या 29 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व त्यानंतर 1973 पर्यंत 26 वर्षे ते याच मंडळाचे कार्याध्यक्ष होते. त्यांनी दिलेली काही व्याख्याने “श्रोतेहो’ ह्या पुस्तकात संग्रहित आहेत. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कामही खूप मोठे आहे. सन 1946 ते 1950 ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते.
सन 1948 मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. नंतर 1960 ते 1963 ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना “साहित्यवाचस्पती’ ही उपाधी प्रदान केली. वाराणसी विश्‍वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डी.लिट्‌. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. केंद्र शासनाने 1948 साली “महामहोपाध्याय’ही पदवी देऊन तसेच 1967 साली “पद्मभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांनी पुण्यासह देशातील अनेक संस्थांचे मार्गदशक म्हंणून काम केले होते. तसेच देशात आणि परदेशातही व्याख्याने दिली होती. पुणे येथे त्यांचे निधन झाले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)