विविधा: प्रमोद महाजन

माधव विद्वांस

ज्यांच्या नावातच मोठा आनंद, आडनावांत मोठेपण असे अजातशत्रू प्रमोद महाजन यांचा आज जन्मदिन.त्यांचा जन्म सामान्य कुटुंबात तेलंगणातील मेहेबूबनगर येथे 30 ऑक्‍टोबर 1949 रोजी झाला. मात्र, त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातील अंबेजोगाई येथे झाले. ते राज्यशास्त्र घेऊन पदवीधर झाले तसेच रानडे इन्स्टिट्यूट पुणेमधून त्यांनी पत्रकारितेची पदवीही संपादन केली. वर्ष 1970-71 या कालावधीत उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतात राजीव गांधी यांनी संगणक वापरास चालना दिली, तर वसंत साठे यांच्या प्रयत्नातून रंगीत दूरदर्शन आले.तर मोबाइल आणि दूरध्वनीचा आज वापर आहे त्याचे श्रेय प्रमोद महाजन यांनाच द्यावेच लागेल. सोशल मीडियाचे भारतातील जनक असेच म्हणावे लागेल. प्रत्येक नवीन गोष्ट भारतीयांच्या पचनी लवकर पडत नाही. या गोष्टीसाठी राजीव गांधी, वसंत साठे व प्रमोद महाजन या तिघांनाही टीकेला सामोरे जावे लागले. तसेच गैरव्यवहाराचे आरोपही झाले. कायम हसतमुख, जिभेवर तर साखर ठेवलेलीच. त्यामुळे त्यांनी असंख्य मित्र जोडले.

लहानपणापासून त्यांचेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होताच.त्यामुळे जनता सरकार व पक्षामध्ये दुहेरी सदस्यत्वाचे मुद्द्यावरून फूट पडली व जुन्या जनसंघातील कार्यकर्ते एकत्र येऊन भारतीय जनता पक्ष निर्माण झाला. या पक्षाचे स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते. वर्ष 1984 नंतर कोणत्याही एका पक्षाचे निर्विवाद बहुमत होणे अवघड आहे हे ओळखून त्यांनी युतीचे राजकारण सुरु करून महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाची मोट बांधण्यात पुढाकार घेतला. वर्ष 1986, 1992, 1998, 2004 या वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले होते.

वर्ष 1996 मध्ये वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री होते. 2001 मध्ये ते दूरसंचार खात्याचे मंत्री झाले व दूरध्वनी क्षेत्रात मोठी क्रांती झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मुत्सद्दीपणाने व प्रेमाने त्यांच्यासारख्या पोलादी पुरुषाचा विश्‍वास संपादन केला. ही त्यांची मोठी जमेची बाजू त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाने पाळेमुळे रोवली. गोपीनाथ मुंडे हे त्याचे जवळचे मित्र व नात्याने मेव्हणे. दोघेही विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते. अंबेजोगाई कॉलेजमधेही ते एकत्र होते. महाजन यांच्या अखेरच्या प्रसंगातही मुंडे धावून आले व त्यांना घेऊन दवाखान्यात गेले पण त्यांचा मित्र त्यांना सोडून गेलाच. आज दोघेही हयात नाहीत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)