विविधा : पुलं…   

माधव विद्वांस 

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात “पुलं’ म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्‍तिमत्त्व, त्यांची आज जयंती. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजच सुरुवात होत आहे. वक्‍ते, अभिनेते, लेखक, नाटककार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, विनोदाचे बादशहा असे अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्वाचे पु. ल.! या दोन शब्दांबद्दल लिहावे तेवढे थोडे आहे. त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर 1919 रोजी मुंबई येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कै. वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे कवी आणि लेखक होते. त्यांचा प्रभाव पु.ल. यांचेवर साहजिकच पडला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर आणि प्रसिद्ध हार्मोनियमपटू दत्तोपंत राजोपाध्ये ह्यांच्या सहवासातून अनुकमे नाट्य आणि संगीत ह्या क्षेत्रांकडे ते ओढले गेले. ‘ललितकुंज’ ह्या नाट्यसंस्थेत त्यांना चिंतामणरावांकडून अभिनयाचे धडे मिळाले. त्यांचे वडील ते वीस वर्षांचे असतानाच वारले. त्यामुळे त्यांना नोकरी करणे भाग होते. त्यांचे शिक्षण एमएएलएलबीपर्यंत झाले होते. कारकून, शिक्षक, प्राध्यापक अशा नोकऱ्या त्यांनी केल्या. वर्ष 1943 च्या सुमारास अभिरुची ह्या मासिकातून त्यांनी लेखन करण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांना अनेक नियतकालिकातून लेखनाची संधी प्राप्त झाली. दरम्यान नाट्यक्षेत्रातील बरोबरच चित्रपटसृष्टीतही त्यांचा प्रवेश झाला. त्यांचे रंगभूमीवरील पहिले नाटक (वर्ष 1948) “तुका म्हणे आता’ हे अयशस्वी ठरले.

रशियन नाटककार निकोलाय गोगोल यांचे “द इन्स्पेक्‍टर जनरल’ चे मराठी रूपांतरित “अंमलदार’ हे नाटक त्यांनी मंचावर आणले व त्यात आमदारांची भूमिकाही केली. हे नाटक प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. “पुढचे पाऊल’ ह्या महाराष्ट्रात गाजलेल्या तमाशापटात त्यांनी नायकाची यशस्वी भूमिका केली. “गुळाचा गणपती’ ह्या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचे कथा-संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका एवढ्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या होत्या.

पुढे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर मराठी नाट्यविभाग-प्रमुख, दिल्लीच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे पहिले निर्माते व आकाशवाणीवरील अखिल भारतीय नाट्यविभागाचे प्रमुख निर्माते, अशा विविध जबाबादाऱ्या त्यांनी सांभाळल्या.अखेरच्या काळात ते पुणे येथे स्थायिक झाले. आचार्य अत्रे आणि पु .ल. समकालीन विनोदी आणि मार्मिक बोलणारे आचार्यांचे विनोद जरा बोचणारे पण त पुलंचे विनोद व टिका खुसखुशीत व आनंददायी होते.पुल प्रसंगानुरूप कोट्या करून श्रोत्यांचे मनोरंजन करीत हे पण एक वैशिष्ट्‌य.

सुनीता देशपांडे या त्यांच्या पत्नी त्यांनी पु. ल. देशपांडेंच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे “आहे मनोहर तरी…’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. आज या हरहुन्नरी व्यक्‍तिमत्त्वास जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)