विविधा : पांडुरंगशास्त्री आठवले   

माधव विद्वांस 
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक, तत्त्वज्ञ, पांडुरंगशास्त्री आठवले यांचे आज पुण्यस्मरण. पांडुरंगशास्त्री आठवलें यांचा जन्म 19 ऑक्‍टोबर 1920 रोजी रोहा येथे झाला व निधन 25 ऑक्‍टोबर 2003 रोजी मुंबई येथे झाले. गुरुवर्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या शिक्षणाची व संस्काराची माहिती घेणेही या आधुनिक काळातील पालकांना आवश्‍यक आहे. संस्कारातून एक तत्त्वज्ञ घडविण्याचे काम त्यांच्या वडिलांनी केले. त्यांचे आजोबा लक्ष्मणशास्त्री आठवले रोहा येथील इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक होते. पण ते रात्री ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांवर विवेचन करीत. ते सुधारणावादी होते त्यामुळे दलित वस्तीत जाऊन ते समाज प्रबोधन करीत असत.
पांडुरंगशास्त्री यांच्या वडीलांनी पुढे 1926 साली विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर श्रीमद्‌भगवत्‌गीता पाठशाळा’ या लोक प्रबोधन पाठशाळेची माधवबाग, मुंबई येथे स्थापना केली. तेथे त्यांना पाठशाळेच्या कामासाठी चांगल्या माणसाची कमतरता वाटत होती व हे काम आपला मुलगाच करू शकेल, असे त्यांना वाटले व त्यासाठी मुंबईहून आपल्या मुलाला रोहा येथे परत नेण्याचे ठरवून तेथे सरस्वती संस्कृत पाठशाळा’ स्थापन करून तेथेच त्यांचे शिक्षण सुरू केले. हा त्यांचा निर्णय घरातील कोणालाच आवडला नव्हता. तरीही ठामपणे ते रोहा येथे आले व पांडुरंगाचा पांडुरंगशास्त्री बनविला. जगाला एक मार्गदर्शक मिळवून दिला. वेद व गीता यांच्यातील सद्विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहोचतील, याचाच त्यांनी ध्यास घेतला होता.
वर्ष 1955 मधे सरस्वती पूजनाचे दिवशी तत्त्वज्ञान विद्यापीठ या संस्थेची उभारणी केली. त्यांनी सन 1958 मधे गुजरातमधील काठेवाडपासून “स्वाध्याय’ चळवळीची सुरुवात केली. “स्वाध्याय’मार्फत त्यांनी सहकार चळवळीला उत्तेजन दिले व शेती, मासेमारी आणि वृक्ष लागवड अशा अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या. जातीपातीच्या भिंती तोडून लाखो स्वाध्यायींची सद्‌सद्विवेकबुद्धी त्यांनी जागृत केली. त्यांच्या या कार्याला कोळीबांधवानी मोठी साथ दिली. अनेक राजकीय नेते त्यांच्या प्रवचनाला हजेरी लावत असत. या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी निर्मलाताईंनीही भक्कम साथ दिली. स्वाध्याय परिवारातील स्वयंसेवकांना त्या मार्गदर्शन करीत असत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)