#विविधा: पहिली चित्रपट अभिनेत्री कमलाबाई गोखले 

माधव विद्वांस 
 
भारतातील पहिल्या स्त्री अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा आज 6 सप्टेंबर रोजी जन्मदिन (पूर्वाश्रमीच्या कमला कामत). त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षीच नाटकात छोटी भूमिका केली होती.घरातील परिस्थितीमुळे मेळ्यातून त्यांनी कामे केली होती. त्यांची आई दुर्गाबाई कामत या पण अभिनेत्री होत्या. मोहिनी भस्मासुर या चित्रपटात माय लेकींनी बरोबरच काम केले. मराठीतील चरित्र अभिनेते चंद्रकांत गोखले हे त्यांचे चिरंजीव व विक्रम गोखले हे त्यांचे नातू. पूर्वी जेंव्हा चित्रपट निर्मिती सुरू झाली तेव्हा प्रामुख्याने पौराणिक सिनेमांची निर्मिती होत असे व ते मूकपट असत व स्त्रियांची भूमिका पुरुषच करायचे. राजा हरिश्‍चंद्रानंतर दादासाहेब फाळके यांना नायिकेसाठी महिलाच असावी असे वाटू लागले.
जेव्हा “मोहिनी भस्मासुर’ हा चित्रपट दादासाहेब फाळके यांनी चित्रित करायचे ठरविले तेव्हा स्त्री भूमिकेसाठी त्यांनी कमलाबाई यांची निवड केली. चित्रपटात वयाच्या तेराव्या वर्षीच कमलाबाईंना नायिकेची भूमिका मिळाली व त्या पहिल्या स्त्री अभिनेत्री ठरल्या. नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम होऊ शकते हे लक्षात घेऊन नाट्य कलाप्रसाद या नाट्यसंस्थेने अस्पृश्‍यता निवारण हा सामाजिक प्रश्‍न स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उ:शाप या नाटकाचे माध्यमातून रंगभूमीवर आणला व त्यामध्ये कमलाबाईंनी समर्थपणे भूमिका बजावली.त्यावेळी संगीत नाटकेही प्रेक्षक आवडीने बघायचे. पण संगीत नाटकांची निर्मिती करणारी किर्लोस्कर कंपनी बंद झाली.
रघुनाथराव गोखल्यांच्या चित्ताकर्षक या नाट्यसंस्थेत त्या काम करू लागल्या ही संस्था गद्य नाटके सादर करायची. रघुनाथराव गोखल्यांचे निधनानंतर रामभाऊ गोखले यांनी चित्ताकर्षकची सूत्रे हाती घेतली व पुन्हा संगीत आणि पौराणिक नाटकांची निर्मिती सुरू केली. कमलाबाईंना संगीताची जाण होती तसेच त्या उत्तम गात असल्याने व अभिनय असल्याने त्या रंगभूमीवर लोकप्रिय झाल्या. पुंडलिक तसेच मृच्छकटिक संगीत या नाटकातून कमलाबाईंनी प्रमुख भूमिका केल्या.
काही कारणाने चित्ताकर्षक मंडळी नुकसानीत आल्याने कंपनी बंद करावी लागली पण मनोहर स्त्री संगीतमंडळी ही नवी नाट्यसंस्था कंमलाबाईंनी स्थापन केली. या कंपनीत पुरुष व स्त्री या दोनही भूमिका स्त्रियाच पार पाडत असत. स्त्रियांची ही पहिलीच नाटक कंपनी होती. त्यालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सन 1913 मधील “मोहिनी भस्मासुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट तर 1980 मधील “गहराई’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट, 67 वर्षे इतकी प्रदीर्घ अभिनय सेवा रसिकांना दिली. त्यांच्या मागे चंद्रकांत गोखले व त्यांचे मागे विक्रम गोखलेही रंगभूमी, चित्रपट व टीव्ही मालिकेतून अभिनयाचा वारसा चालवीत आहे. पहिल्या अभिनेत्रीस मानाचा मुजरा. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)