विविधा : नाटककार गोविंद बल्लाळ देवल   

माधव विद्वांस 

मराठीत संगीत शारदा या नाटकातून सामाजिक विषय रंगभूमीवर आणणारे पहिले नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांची आज जयंती. त्यांचा जन्म सांगलीजवळील हरिपूर येथे 13 नोव्हेंबर 1855 रोजी झाला. त्यांचे लहानपण सांगली येथे गेले तर शिक्षण बेळगाव येथे झाले व तेथेच शिक्षण पूर्ण झाल्यावर देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करू लागले. बेळगाव येथे असतानाच देवल यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीबरोबर संबंध आला व ते कंपनीत जाऊ लागले. अभिनेता हा जन्मतःच अभिनयाचे गुण घेऊन येतो पण त्याची ओळख त्याला होण्यास योग्य वेळ यावी लागते; त्याप्रमाणे किर्लोस्कर मंडळीत त्यांना त्यांच्या सुप्त गुणांची ओळख पटली. किर्लोस्कर मंडळीत ते सहाय्यक दिग्दर्शक व काही अभिनयाची कामे करू लागले.

-Ads-

किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. कालांतराने वर्ष 1894 मध्ये देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले, पण मूळ पिंड नाटककाराचा असल्याने त्यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. पुढे 1913 साली देवल गंधर्व नाटक मंडळीत गेले. या वेळपर्यंत त्यांच्यातील नाटककार, गीतकार व संगीतकार जागा झालेला होता. संगीत नाटकांना त्यावेळी अफाट लोकप्रियता मिळत होती. देवल हे सुधारणावादी असल्याने त्यांनी सामाजिक विषयाला हात घालून “संगीत शारदा’ या नाटकाची निर्मिती केली व प्रायोगिक नाट्यपरंपरा सुरू झाली असेच म्हणावे लागेल. संगीत शारदा नाटक व नाटकातील बहुतेक पदे त्यांनी लिहिली तसेच त्याचे संगीतही त्यांनीच दिले. त्यावेळची सामाजिक परिस्थिती त्यांनी नाटक आणि नाट्यगीतातून प्रभावीपणे मांडली “म्हातारा इतुका न अवघें पाऊणशें वयमान’, “लग्ना अजुनि लहान’ या गाण्यातून पुरुषाची मानसिकता त्यांनी पुढे आणली तसेच स्त्रियांच्या मनातील चलबिचलही इतर नाट्यगीताचें माध्यमातून त्यांनी रंगमंचावर आणली.

“संगीत मृच्छकटिक’ या नाटकातील गाजलेले नाट्यगीत “रजनिनाथ हा नभीं उगवला. राजपथीं जणुं दीपचि गमला’ त्यांनीच लिहिले तसेच त्याला संगीतही त्यांचेच होते. छोटा गंधर्वांनी ते गायले होते. कालिदासाचे मूळ संस्कृतमधील नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. दुर्गा, मृच्छकटिक, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ अशा सुंदर नाट्यकृती त्यांनी मराठी रंगभूमीला दिली. या आधुनिक कालिदासाला अभिवादन.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)