विविधा: दिनकर द. पाटील 

माधव विद्वांस 

संवाद लेखक, चित्रपट दिग्दर्शक, कथालेखक, पटकथाकार दिनकर द. पाटील यांची आज जयंती. संवाद लेखक व चित्रपट दिग्दर्शक असलेल्या दिनकर पाटील यांनी आपली कारकिर्द पत्रकार म्हणून सुरू केली.त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1915 रोजी बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते कोल्हापुरातील वृत्तपत्रातून लेखन करू लागले. काही दिवसांनी ‘हंस पिक्‍चर्स’ या मास्टर विनायकांच्या चित्रपट कंपनीत ते रूजू झाले, वर्ष 1941 ते 1947 पर्यंत या कालावधीत त्यांनी तेथे नोकरी केली. त्यांना वर्ष 1947 मध्ये ‘मंगल पिक्‍चर्स’च्या ‘जय मल्हार’ चित्रपटाकरता संवाद लिहिण्याचे काम वामनराव कुलकर्णी व विष्णूपंत चव्हाण यांनी दिले व त्यांच्या चंदेरी दुनियेतील कारकिर्दीस सुरूवात झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हापुरात राहिल्यामुळे त्यांच्या भाषेत खास कोल्हापुरी बाज होताच त्यामुळे ग्रामीण चित्रपटांचे लेखन खास ढंगाचे झाले. संवाद लेखन हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असतो त्यामुळे बोलीभाषेचा अभ्यासही महत्त्वाची गोष्ट त्यांच्या संवादातून जाणवते.संवाद लेखनाबरोबरच ते दिग्दर्शनही करू लागले. दिनकर पाटील यांनी प्रमुख चित्रपट निर्मात्यांसह आणि मास्टर विनायक, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, हरी नारायण आपटे, लता मंगेशकर, व्यंकटेश माडगूळकर, तसेच चंद्रकांत आणि सूर्यकांत मांडरे यांसारख्या कलाकारांसोबत काम केले.

वैयक्तिक कर्जामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले व दिवाळखोरीपण नशिबी आली पण खचून न जाता आपले काम चालू ठेवून त्यावर मात केली. पाटलाचं पोर हे पाटील यांचे आत्मचरित्र वर्ष 1984 मध्ये प्रकाशित झाले असून त्याचा अन्य भारतीय भाषांमध्येही अनुवाद करण्यात झाला आहे. आत्मचरित्रातून दिनकर पाटील यांनी आपल्या चित्रपट लेखन व दिग्दर्शन यातील अनुभवांचे सुंदर वर्णन केले आहे. ग्रामीण आणि शहरी जीवनातील लोकांचे निरीक्षण करून ते संवाद लिहीत त्यामुळे त्यात नैसर्गिकता असे. “सांगत्ये ऐका’ या चित्रपटात तर त्यांनी ग्रामीण राजकारण आणि लोकजीवन सुरेख पद्धतीने संवादबद्ध केले. वर्ष 1950 ते 1970 या दोन दशकात तमाशा प्रधान तसेच अस्सल ग्रामीण जीवनावरील अंतरंग सुरेख पद्धतीने शब्दबद्ध केले.

कौटुंबिक व सामाजिक चित्रपटांचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन हेसुद्धा त्यांनी ताकदीने केले. “ज्योतिबाचा नवस’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद या दोन्ही गोष्टी त्यांनी सांभाळल्या. शिवरायांची सून ताराराणी व धन्य ते संताजी धनाजी ऐतिहासिक चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. 40 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत 100 वर चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले तर 60 चे वर चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले दि. 23 ऑक्‍टोबर 2005 या दिवशी दिनकर पाटील यांचे कोल्हापूर येथे निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)