विविधा : दत्ता डावजेकर   

माधव विद्वांस 

लता मंगेशकर यांना पार्श्‍वगायिका म्हणून प्रथम संधी देणारे, गीतकार आणि संगीतकार म्हणून ओळख असणारे दत्ता डावजेकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1917 रोजी झाला.दत्ताजींचे वडील तबलावादक होते. ते लोकनाट्यात तसेच उर्दू नाटकात तबलावादन करीत. दत्ताजी त्यांचेबरोबरच असायचे. त्यामुळे पेटी व तबल्याचे बाळकडू त्यांना मिळाले. त्यांनी गाण्यांना चाली लावण्याचा प्रयत्न चालू केला.

त्यावेळच्या आघाडीच्या नायिका व गायिका शांता आपटे गाण्याचे कार्यक्रम करायच्या त्यांनी डावजेकरांना घेऊन उत्तर भारतात भरपूर कार्यक्रम केले. त्या त्यांना महिन्याला 20 रुपये पगार देत असत. ते सी. रामचंद्र आणि चित्रगुप्त यांचे सहाय्य्क म्हणून काम करू लागले. वर्ष 1939 मध्ये त्यांना पहिल्यांदाच संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली व “म्युनिसिपालिटी’ या मराठी चित्रपटाला संगीत दिले व संगीतकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

सन 1942 मध्ये “सरकारी पाहुणा’ या चित्रपटाला संगीत दिले. त्यानंतर एकापाठोपाठ मराठी व हिंदी चित्रपट त्यांना मिळू लागले. “आपकी सेवा में’ या हिंदी चित्रपटात “पा लागूं कर जोरी रे’ या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना त्यांनी पार्श्‍वगायिका म्हणून प्रथमच संधी दिली. त्यांना 1943 मध्ये “माझं बाळ’ हा मराठी चित्रपट मिळाला. त्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच मराठीतून पार्श्‍वगायन केले.

त्यानंतर दत्ताजींनी लताजींच्या भगिनी आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा यांनाही पार्श्‍वगायिका म्हणून प्रथम संधी दिली. मालती पांडे व लता राव यांनाही त्यांनी गायनाची संधी दिली होती. त्यांनी 60 चित्रपटांसह 10 ते 12 नाटकांनाही संगीत दिले होते.

मास्टर विनायक, राजा परांजपे, गजानन जागीरदार, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांना काम करण्याची संधी प्राप्त झाली होती. पाठलाग, रंगल्या रात्री अशा, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र या चित्रपटासाठी दिलेले संगीत अविस्मरणीय ठरले. त्यांचे संगीत विलक्षण गाजले.
अनोल बर्वे यांच्या “थॅंक यू मिस्टर ग्लॅड’ या नाटकासाठी त्यांनी जर्मन संगीताचाही अभ्यास केला होता. दत्ताजींना अभिवादन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)