विविधा: डॉ. रघुनाथ माशेलकर

माधव विद्वांस

हळदीची लढाई जिंकणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे आज अभीष्टचिंतन. त्यांचा जन्म गोव्यातील माशेल येथे 1 जानेवारी 1943 रोजी झाला. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेच त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या आईने जिद्दीने कष्ट करून त्यांना शिक्षण दिले. आई हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. त्यांच्या आईला शिक्षण नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला तो आपल्या मुलाचे वाट्याला येऊ नये, या ध्येयाने प्रेरित होऊन मुलाला उच्च शिक्षित केले व भारताचे नाव उंचविणारा शास्त्रज्ञ राष्ट्राला मिळवून दिला. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी व पदव्युत्तर शिक्षण संपादन केले तसेच माशेलकरांनी आपली पीएच.डीची पदवी प्राप्त केली. तेथे त्यांना प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर मॅंचेस्टर सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्‍टरल संशोधनही केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अलीकडे झालेली हळदीची लढाई (हळदीचे पेटंट) तेवढीच रोचक आहे. या लढाईत अमेरिकेच्या बाजूने हळदीचं पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे भारतीयच होते. तर तेथे पेटंट कार्यालयात तपासणीस कुमार हे पण भारतीयच होते. 1995 मध्ये त्यांना पेटंट मिळाल्याचे वृत्तपत्रातून आल्यावर डॉ. माशेलकर यांना धक्‍का बसला व त्यांनी या गोष्टीस आव्हान देण्याचे ठरविले. त्याच वर्षी माशेलकर यांची दिल्लीमध्ये सीएसआयआरचे (वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद) संचालक म्हणून नियुक्‍ती झाली होती.

सीएसआयआरमधील सर्व शास्त्रज्ञ डॉ. माशेलकरांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागले. सीएसआयआरने संस्कृत, उर्दू आणि हिंदीमधील 32, शंभर वर्षांपेक्षा जुने संदर्भ शोधून काढले. अखेर 23 ऑगस्ट 1997 रोजी भारतीयांचा दावा मान्य केला गेला. याचे पाठोपाठ कडुनिंब, बासमती तांदूळ याबाबतीतही भारताला डॉ. माशेलकरांमुळे पेटंट मिळाली. डब्ल्यू. आर. ग्रेस नावाच्या कंपनीला युरोपात कडुनिंबापासून बनवलेल्या एका कीटकनाशकावर पेटंट देण्यात आले. त्याविरुद्धही पाच वर्षे लढा देऊन ते पेटंट भारताच्या नावे आणले.

भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. त्यांनी 25 पुस्तके, 284 शोधनिबंध लिहिले आहेत आणि भारतातून आणि परदेशातील 38 विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्‍टरेट्‌स देऊन सन्मानित केले आहे. ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्यही आहेत. यूके रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून काम करणारे ते तिसरे भारतीय अभियंता आहेत आणि अमेरिकेत राष्ट्रीय ऍकेडमिक ऑफ अवेन्टर्स म्हणून निवडणारे पहिले भारतीय आहेत. त्यांना तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण कोणता विचारले असता ते म्हणाले, जेव्हा मी 1998 मध्ये लंडनमध्ये एफआरएस प्राप्त केली तेव्हा जेथे न्यूटनने स्वाक्षरी केली होती तेथे मी याच पुस्तकात स्वाक्षरी केली आणि 9 व्या पानावरील न्यूटन यांची सही बघितली तो क्षण आनंदाचा होता.

डॉ. माशेलकरांना दीर्घायुष्य मिळो हीच शुभेच्छा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)