विविधा: टुणटुण (उमा देवी)

माधव विद्वांस

आपल्या स्थूलपणाचा योग्य वापर करून प्रेक्षकांना हसविणाऱ्या टुणटुण अर्थात उमा देवी खत्री यांचे आज पुण्यस्मरण. सर्वाना हसविणाऱ्या या अभिनेत्रींचे जीवन खूप खडतर होते. आई, वडील व भाऊ यांचे पश्‍चात त्यांना बालपणीच संघर्ष वाट्याला आला. चुलत्यांनी त्यांना सांभाळले तरी मायेचे छत्र त्यांचे नशिबी नव्हते. त्यांच्या मृत्यूपूर्वी दोनच दिवस आधी शिशिर शर्मा यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, माझे आई-वडील कोण होते आणि ते कसे होते ते मला आठवत नाही, ते दोघे मरण पावले तेव्हा मी अडीच वर्षाची होते. मला आठ वर्षाचा एक भाऊ होता त्याचे नाव हरी होते. त्याच्याबरोबर मी राहात होते एक दिवस त्याचाही खून झाला व मी पोरकी झाले व नातेवाइकांच्याकडे दोन वेळच्या खाण्याचे मोबदल्यात घरकाम करू लागले. त्यांना गाण्याची आवड होती व रेडिओवर गाणी ऐकून त्या गाणी गुणगुणत असत त्यांना नाझीर अब्बास काझी यांनी प्रोत्साहित केले व मदतही केली.

फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानला गेले व टुणटुण नशीब अजमावण्यासाठी मुंबईला गेल्या. कालांतराने नाझीर अब्बास काझी मुबई येथे परत आले व त्यांचेशी त्या विवाहबद्ध झाल्या. नौशाद अली यांचेकडे त्या काम मागण्यासाठी गेल्या काही दाद लागेना तेंव्हा त्या सरळ नौशाद यांना म्हणाल्या की, “मला काम द्या नाहीतर समुद्रात उडी टाकून मी जीव देईन.’ अखेर नौशादजींनी वर्ष 1946 मध्ये एका समूह गाण्यात त्यांना काम दिले. वर्ष 1947 मधे “अफ़साना लिख रही हूँ दिल-ए-बेक़रार का’ हे गाणे त्यांना मिळाले व त्यांचा चंदेरी दुनियेत गायिका म्हणून प्रवेश झाला.

दरम्यान आशा, लता या पार्श्‍वगायिका म्हणून पुढे येऊ लागल्या होत्या त्यांना नौशादजींनी सल्ला दिला की, तू विनोदी अभिनेत्री म्हणून चांगले काम करशील. त्यांनी दिलीपकुमारसमवेत वर्ष 1950 मध्ये ‘बाबुल या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा विनोदी अभिनेत्री म्हणून काम केले व मागे वळून पाहिले नाही. बाबुल सिनेमाच्यावेळी दिलीपकुमार व उमा देवी खत्री यांचेवर चित्रीकरण चालू होते. त्यावेळी धावता धावता दिलीपकुमार त्यांच्या अंगावर पडले व या दृश्‍यानंतर त्यांनी तिचे टुणटुण असे नामकरण केले. वर्ष 1950 ते 1990 या चार दशकांच्या कारकिर्दीत 200चे वर चित्रपटात भूमिका केल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)