#विविधा : चरित्रकार वि. स.वाळिंबे 

– माधव विद्वांस

पुण्यातील दैनिक प्रभातमधून पत्रकारितेला सुरुवात करणारे कै.वि. स.वाळिंबे यांची आज 11 ऑगस्ट रोजी जयंती. पत्रकार, संपादक, प्रकाशक, चरित्रकार अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे पूर्ण नाव विनायक सदाशिव वाळिंबे. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1928 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. सन 1948 मध्ये संघ बंदीच्या विरोधातील चळवळीमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले, व त्यांचे शिक्षण खंडित झाले. त्यानंतर ते पुण्यातील दै. प्रभात वृत्तपत्रामध्ये नोकरीवर रुजू झाले. काही काळ “ज्ञानप्रकाश’ या वृत्तपत्रातही त्यांनी नोकरी केली. साधारण 1962 नंतर ते दै. केसरी मध्ये वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले. त्याच वेळी ब्रिटनमध्ये कार्डिफ येथे पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. नोकरी पत्रकारिता चालू असतानाच ते लेखनाकडे वळले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतिहास आणि तो घडविणाऱ्या व्यक्‍ती याच्याबद्दल वाळिंबे यांना आकर्षण होते. त्यांनी सुमारे 50 चे वर पुस्तके लिहिली. ही पुस्तके प्रामुख्याने इतिहास व इतिहासातील घटना व व्यक्तिरेखा यांच्यावर आहेत. इंदिरा गांधी, पंडित नेहरू यांच्या जीवनावर त्यांनी प्रकाश टाकणारे पुस्तकही लिहिले. हिटलर या व्यक्‍तिरेखेवर वि.ग.कानिटकर (“नाझी भस्मासुराचा उदय व अस्त’ अनुवादीत) आणि वि. स. वाळिंबे (“हिटलर’) या दोघांनीही पुस्तके लिहिली.

प्रखर राष्ट्रवादी असल्याने भारतातील स्वातंत्रय लढ्यातील इतिहासाशी निगडित असणाऱ्या घटना व व्यक्‍तिरेखा यांचा त्यांनी मागोवा घेतला त्यातूनच “श्रीशिवराय’, “सत्तावन्न ते सत्तेचाळीस’, “1857 ची संग्राम गाथा’, ‘गरुडझेप’, “नेताजी’, “स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘स्वातंत्र्यसंग्राम : ज्ञात आणि अज्ञात’, “भारत – 1947 पूर्वी’ अशी पुस्तके त्यांनी लिहिली.

त्यांच्या लेखनात प्रसंगातील घटनांचे अत्यंत बारकाईने लेखन करीत व तो प्रसंग वाचकाचे पुढे उभा करीत असत. व्यक्‍तिरेखा लेखनातून रंगविताना त्या व्यक्‍तीच्या स्वभावाचे पैलू मार्मिकपणे वाचकाचे पुढे आणीत असत. त्यांचे इतिहास लेखन रुक्ष न वाटता रंजक व उत्कंठा वाढविणारे असे. “स्टॅलिनची मुलगी’, “इस्रायलचा वज्रप्रहार’, “वॉर्सा ते हिरोशिमा’, “स्वेतलाना’ या अन्य विषयावर त्यांनी पुस्तके लिहिली. ‘इन जेल’ या कुलदीप नायर यांचे पुस्तकाचा अनुवाद केला. “भारत विकणे आहे’, “द वर्ल्ड ऑफ कपिल देव’, “वुइ दि नेशन’, व “वुइ दि पीपल’ या पुस्तकाचे अनुवादही केले. ऐतिहासिक व्यक्‍ती अथवा घटना यावर लेखन करताना अनेकदा तारतम्य बाळगावे लागते आणि सर्व तपशील जास्तीत जास्त अचूक असल्याची खात्री करुन घ्यावी लागते. अन्यथा लेखकावर अनावस्था प्रसंग ओढवण्याची शक्‍यता असते. या निकषावर वाळिंबे यांची लेखनसाधना ही अभूतपूर्व आणि अभ्यासपूर्ण होती.

सन 1965-66 च्या सुमारास वि. स. वाळिंबे यांनी “गरुडझेप’ व “वज्रप्रहार’ ही स्वतःची दोन पुस्तके प्रकाशित करुन अभिजित प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली. दि. 22 फेब्रुवारी 2000 रोजी त्यांचे निधन झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)