विविधा : ग. त्र्यं. माडखोलकर 

माधव विद्वांस 

संयुक्‍त महाराष्ट्राची मागणी आवेशाने मांडणारे ग. त्र्यं. माडखोलकर यांचे उद्या पुण्यस्मरण. (जन्म 28 डिसेंबर, 1900, मुंबई; निधन 27 नोव्हेंबर, 1976 नागपूर) समीक्षक, लेखक, कवी, नाटककार, संयुक्‍त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते व पत्रकार म्हणून गजानन त्र्यंबक माडखोलकर यांची ओळख आहे. सुरवातीच्या काळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. वर्ष 1920 मध्ये रवीकिरण मंडळाची पुण्यामधे काही कवींनी स्थापना केली. कवितांना प्रसिद्धी देणे तसेच त्यावर चर्चा घडवून आणणे हा उद्देश होता.

त्याच्या प्रमुख संस्थापक सदस्यांपैकी माडखोलकर एक होते. मंडळाच्या 1924 साली प्रकाशित झालेल्या ‘उषा’ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. न. चिं. केळकरांचे लेखनिक ते नागपूरच्या ‘तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून 1944 ते 1967 पर्यंत पत्रकारितेचा प्रवास करीत निवृत्त झाले. भारताच्या 1930 व 1942 च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच 1946 नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आपली लेखणी व वाणी या दोन गोष्टींचा प्रभावी वापर केला.

वेगळ्या विदर्भाला त्यांचा विरोध होता. हिंदी भाषा प्रचार प्रसार साठीही ते प्रयत्नशील होते. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. त्यांनी केलेला पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर प्रकाश टाकणारा आहे. संयुक्त महाराष्ट्राची मागणी ही तशी खूप जुनी आहे. वर्ष 1917 मध्ये प्रा. विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी “लोकशिक्षण’या मासिकात एक लेख लिहून मध्य प्रदेश, हैदराबाद व कानडी विभागात पसरलेल्या मराठी भाषिकांचा वेगळा प्रांत असावा हि कल्पना प्रथम मांडली होती. हाच धागा पकडून बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर केला गेला.

मराठी भाषा व भाषिक या बाबतीत ते खूपच हळवे होते. मराठी वाचन, लेखन यामुळेच मराठीचा उत्कर्ष होईल या मताचे ते होते. महाराष्ट्रातील सर्व मराठी बहुभाषिक प्रदेश एकाच छत्राखाली असावेत असे त्यांचे ठाम मत होते. नागपूरमध्ये राहूनही त्यांनी हेच विचार सातत्याने मांडले. ते कवी होतेच तसेच त्यांनी सुमारे 18 कादंबऱ्या, ललित लेख, लघुकथा, नाटक अशा सर्व प्रकारात लेखन केले. मराठी बाण्याच्या पत्रकारास अभिवादन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)