#विविधा: क्रांतिकारक जतिन दास 

माधव विद्वांस
तुरुंगातच 63 दिवसाच्या उपोषणा नंतर प्राण सोडलेले क्रांतिकारक जतिन दास यांचे आज पुण्यस्मरण. दिनांक 27 ऑक्‍टोबर 1904 रोजी त्यांचा कोलकाता येथे जन्म झाला ते कॉलेजमध्ये शिकत असतानाच स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. सन 1921 मध्ये गांधीजींच्या असहकार आंदोलनात जतिन दास सहभागी झाले होते.
नोव्हेंबर 1925 मध्ये कोलकाता येथील विद्यासागर महाविद्यालयात बी.ए. शिकत असताना जतीन दास यांना अटक करण्यात आली आणि त्यांना मैमनसिंग सेंट्रल जेलमध्ये तुरुंगात डांबण्यात आले. राजकीय कैद्यांना अपमानास्पद वागणूक देण्याच्या निषेधार्थ त्यांनी त्यांचे पहिले उपोषण सुरू केले. नंतर 20 दिवसांनंतर जेल अधीक्षकांनी माफी मागितल्यानंतर उपोषण त्यांनी सोडले.
त्यानंतर भारताच्या इतर भागांमधील क्रांतिकारकांनी त्यांच्याशी संपर्क साधला, नंतर त्यांनी भगतसिंग आणि सहकाऱ्यांसाठी बॉम्ब बनवण्यास सहमती दिली. त्यानंतर 14 जून 1929 रोजी लाहोर कटाबाबत दोषी ठरवून लाहोर तुरुंगात ठेवण्यात आले.
लाहोर तुरुंगात कैद्यामध्ये भेदभाव करण्यात येत होता. त्यांचे बरोबर असलेल्या सहकाऱ्यांना अतिशय घाणेरडे अन्न देण्यात येत होते. त्यांना वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी कोणत्याही सोयी मिळत नव्हत्या, गणवेश अनेक दिवसात धुतले नव्हते. स्वयंपाघरात उंदीर झुरळे फिरायची या गोष्टी विरुद्ध त्यांनी आवाज उठविला व उपोषण सुरू केले.
तेथे त्यांनी आमरण उपोषण केले व 63व्या दिवशी तुरुंगातच त्यांनी 13 सप्टेंबर रोजी प्राण सोडले. स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी उपोषणे केली, तुरुंगवासही भोगला पण जतीन दास एकमेव व्यक्‍तिमत्त्व होते कि ज्यांना तुरुंगवासातच उपोषण करताना मृत्यू आला. उपोषण सुरू झालेवर 63 दिवसात पाण्याव्यतिरिक्‍त त्यांनी कोणतेही अन्न घेतले नाही.
तुरुंगाधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने खायला घालण्याचा प्रयत्न केला तसेच सहकाऱ्यांनीही अन्नग्रहण करण्याची विनंती केली होती पण ते उपोषणावर ठाम राहिले व त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांचे शव लाहोरहून कोलकाता येथे रेल्वेने नेणेत आले. वाटेत अनेक लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. नेताजी सुभाषबाबूंनी हावडा स्टेशनवर शवपेटिका स्वीकारली व स्वातंत्र्यसेनानी दुर्गाभाभी यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
जतिन दास या महान क्रांतिवीरास विनम्र अभिवादन. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)