विविधा: कवी गिरीश

माधव विद्वांस

रविकिरण मंडळातील एक प्रमुख कवी. बालकवी गिरीश यांचे मूळ नाव शंकर केशव कानेटकर. त्यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरजवळील फत्यापूर येथे 28 ऑक्‍टोबर 1893 रोजी झाला, तर निधन 4 डिसेंबर 1973 रोजी पुणे येथे झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश सातारा आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी नाव काढले त्यापैकी कवी गिरीश एक होते. गिरीशांनी हे शाळेचे ऋण एका कवितेने फेडले व त्यांनी फक्‍त आपल्या शाळेला उद्देशून लिहिलेली ती कविता पूर्वी रोज प्रार्थना म्हणून सकाळी विद्यार्थ्यांकडून सामुदायिक गायली जायची. कवितेची शब्द सुमने पुढीलप्रमाणे
!! वंदन तुज आनंदे करीत माउली… स्मरण तुझे स्फूर्ती देई जीवनातली !!

-Ads-

ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे काही काळ प्राचार्य होते. फलटण येथेच त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता रचल्या आहेत. फलटण, पुणे, सांगली येथे शिक्षक व प्राध्यापक म्हणून काम केले. कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. वर्ष 1959 मध्ये त्यांना शिक्षण क्षेत्रातील सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पारितोषिक मिळाले. निवृत्तीनंतर सांगलीस स्थायिक झाले. त्यांच्या कवितेतून वास्तव डोकावते. “पोर खाटेवर मृत्युच्याच दारा… कुणा गरिबाचा तळमळे बिचारा…’ या कवितेतून मुलाची आई जवळ नसणाऱ्या अगतिक बापाची मनःस्थिती व तो दुःखद प्रसंग कविता वाचताना डोळ्यात अश्रू उभे राहतात. “तव भास अंतरा झाला, मन रमत मोहना…’ पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेले आशालता वाबगावकर यांनी गायलेले मत्स्यगंधा नाटकातील हे गीत त्यांनीच रचले आहे. गिरीशांचे नावावर अनेक कविता व कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

वर्ष 1923 मधील अभागी कमल ह्या सामाजिक विषयातील खंडकाव्याने त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली. अर्वाचीन मराठीमधील सामाजिक खंडकाव्याचे ते आरंभस्थान मानले जाते. वर्ष 1930 मधील “कांचनगंगा’ मधील कविता, वर्ष 1928 मधील “आंबराई’ हे ग्रामीण जीवनावरील खंडकाव्य. वर्ष 1954 मधील “अनिकेत’ हे लॉर्ड टेनिसनच्या “ईनक आर्डन’ ह्या काव्याचे भाषांतर, तसेच फलभार, मानसमेघ इ. काव्यसंग्रहातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. काव्यकला, मराठी नाट्यछटा हे टीकात्मक लेखनही त्यांनी केले आहे. माधव ज्युलियन्‌ यांचे स्वप्नभूमी हे चरित्र पण त्यांनी लिहिले आहे. “छोटेसे घरकूल थाटुन कलासंसार केला उभा, निष्ठावंत उपासना हळूहळू झाली तयाची सुरू’ ही बालगंधर्वांच्यावर कविताही त्यांनी केली. रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनचे संपादनही त्यांनी केले. कविवर्य गिरीश यांना श्रद्धांजली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)