विविधा : एक दीप त्यांच्यासाठीही 

अश्‍विनी महामुनी

झाले! दिवाळी संपली. परवा शुक्रवारी भाऊबीज झाली. बहिणींनी भावांना ओवाळले, भावांनी बहिणींना ओवाळणी घातली. गोडधोड खाल्ले आणि दिवाळी समाप्त झाली. (माझ्या एका मैत्रिणीच्या घरी भाऊबीजेला खास नॉनव्हेज कार्यक्रम असतो. जोरदार! हे प्रथमच कळले तेव्हा, अशा पवित्र सणावारी कसले गं नॉनव्हेज करता? असे मी तिला सहज म्हटले. तर तिने माझ्याकडे अशा नजरेने पाहिले, की माझ्या हातून काहीतरी मोठ्ठा गुन्हा घडला आहे, असे मला वाटू लागले. त्यानंतर मी तिला कधी टोकले नाही. पण दिवाळीच्या दिवसात आणि खास करून भाऊबीजेच्या दिवशी तिच्याकडे जाणे कटाक्षाने टाळत आले आहे. या गोष्टीला जवळपास दोन दशके झाली आहेत. त्यांची ती पद्धतच आहे म्हणे!)

तसं पाहिलं तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत, म्हणजे तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी चालूच असते. अनेकजण तुळशीचे लग्न झाल्याखेरीज दारात लावलेला आकाशदिवा काढत नाहीत. तुळशीच्या लग्नापर्यंत दारात एक तरी पणती आवर्जून लावली जाते. तोपर्यंत मुलांचेही फुलबाज्या, टिकल्या, लवंगी आणि चिटूर पिटूर फटाके लावणे चालूच असते. लहानपणी आम्ही तुळशीच्या लग्नासाठी थोडे फटाके, खास करून भुईनळे राखून ठेवायचो. एका दृष्टीने पाहिले, तर तुळशीविवाह म्हणजे दिवाळीचा बीटिंग द रिट्रीट म्हणायला हरकत नाही. कार्तिकी पौर्णिमेला तुळशीचे लग्न लागले, की फटाक्‍यांची शेवटची धामधूम होऊन जाते अणि मग पुढील वर्षांपर्यंत फटाके विसरून जायचे.

पूर्वी महिना महिना दिवाळी चालायची. सणांची भावनिक ओढ असायची. आता डामडौल जास्त असल्याचे जाणवते. तशीही आजकालच्या धावपळीच्या आणि भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्त्व देणाऱ्या जगात मनाची कोमलता कमीच होत चालली आहे, नोकरीदारांना आणि व्यापारी-उद्योजकांनाही घरात सण साजरा करण्यासाठी वेळ देणे शक्‍य नाही अशी परिस्थिती आहे. ठिकाणी ऐच्छिक, तर काही ठिकाणी मजबुरी!

दिवाळीपूर्वी आठ-पंधरा दिवस बाजारपेठा भरभरून वाहत असतात. फुलबाजारापासून ते सुवर्णपेढ्यांपर्यंत सर्वत्र गिऱ्हाईकांचा नुसता पूर लोटलेला असतो, आणि दिवाळीच्या ऐन दिवसात तर काही ठिकाणी गिऱ्हाईकांचे सुनामी आलेली असते सुनामी! किती घेशील दोन करांनी, किंवा देणारांचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशी व्यापारी-दुकानदारांची अवस्था झालेली असते. अशी नफ्याची गंगा वाहत असताना घरी थांबून दिवाळी साजरी करणे म्हणजे अव्यावहारिकपणाच की! सणांचा आनंद क्षणाचा. पण आर्थिक लाभ मात्र टिकाऊ.

यांचे असे, ऐच्छिक, तर लष्करातील मंडळी आणि पोलीस खात्यातील कर्मचारी यांचा नाइलाज! त्यांच्याबरोबर ड्रायव्हर, कंडक्‍टर आणि तत्सम काही खाती. या लोकांना दिवाळी साजरी करता येत नाही.. ड्यूटी फर्स्ट या तत्त्वाने. आता तर अनेक व्यवसाय-उद्योग असे झाले आहेत, की त्यांना दिवाळी साजरी करायला फुरसत मिळत नाही, किंवा परवडत नाही. यात महिलांचाही समावेश आहे. पोलीस, वाहतूक पोलीस, कंडक्‍टर, सेल्समध्ये काम करणाऱ्या आणि अन्य अनेक व्यवसायातील महिलांनाही घरी राहून दिवाळसण साजरा करणे, त्याचा आनंद उपभोगणे शक्‍य होत नाही.

आमच्या शेजारची सुनीता ट्रॅफिक पोलीस आहे. तिची दिवाळी तर वाहनांच्या प्रचंड प्रदूषणात होते. तासनतास रस्त्यावरून अनिर्बंध धावणऱ्या वाहनांचे नियंत्रण करत ऊनपावसात थांबायचे म्हणजे कसोटीच. सहज कल्पना करून बघा. दिवाळीच्या काळात सर्व पोलीस रजेवर गेलेत, किंवा सर्व बसड्रायव्हर . बस कंडक्‍टर रजेवर गेले, तर काय गोंधळ होईल? काय हाल होतील सामान्यजनांचे. अत्यंत दुर्लक्षित असणरे सफाई कर्मचारी घ्या. समजा, दिवाळीच्या काळात सर्व सफाई कर्मचारी एकदम रजेवर गेले, तर काय होईंल. सर्वांचा सर्व डामडौल एकदम नष्ट होईल मला तर लष्करी जवान बीएसएफ कर्मचारी, बस ड्रायव्हर, कंडक्‍ट्‍र आणि तत्सम कार्यात सतत गुंतून पडलेल्यांचे सदैव कौतुक वाटत आले आहे. मी नेहमी घरातही सांगते, की ज्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी घरी येता येते नाही, आपणच लावू या एक दीप त्यांच्यासाठी ! देऊया त्यांना मनापासून शुभेच्छा !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)