विविधा: उदय शंकर

माधव विद्वांस

जागतिक कीर्तीचे नृत्यसम्राट, आधुनिक भारतीय नृत्याचा पाया घालणारे उदय शंकर यांची आज जयंती. राजस्थानमधील उदयपूर येथे त्यांचा 8 डिसेंबर 1900 रोजी जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव उदय शंकर चौधरी असे होते. ते बंगाली होते, त्यांचे मूळगाव ‘नारेल’ आता बांगलादेशमध्ये आहे. चित्रकलेचे शिक्षणाबरोबरच त्यांनी नृत्यसराव करायला सुरुवात केली होती. कोणत्याही भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात उदय शंकर यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. त्यांचे वडील झलवार येथील संस्थानच्या नोकरीचा राजीनामा देऊन इंग्लंडला गेले व तेथे जाऊन वकिलीबरोबरच त्यांनी भारतीय संगीत व नृत्य कर्यक्रम सुरू केले.

दरम्यान, उदय शंकर चित्रकलेच्या अभ्यासासाठी इंग्लंडला आले. तिथे तेही नृत्य कार्यक्रमात भाग घेऊ लागले. विख्यात रशियन नर्तिका अना पाव्हलॉव्ह त्यांचे पाहून नृत्य प्रभावित झाली व उदय शंकर यांना नृत्यकलेसाठी प्रोत्साहन दिले. पाव्हलॉव्हच्या पथकाबरोबर त्यांनी अनेक देशांचा दौरा केला. पॅरिसला आल्यावर, तेथे त्यांनी युरोपियन संस्कृती व कला यांचा अभ्यास केला. नृत्याचे अनेक कार्यक्रम पाहिले व केले. ह्या अनुभवातून त्यांची कला आकार घेत होती. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये आले. मादाम सिमकी नावाच्या फ्रेंच शिष्येबरोबर त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले. हे करत असतानाच त्यांनी भारताला वारंवार भेटी दिल्या आणि भारतीय नृत्याचा व्यासंग वाढवला.

1927 मध्ये आपल्या पाश्‍चात्य सहकाऱ्यांचे बरोबर भारतातील कलेचा इतिहास जाणण्यासाठी भारतात आले त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनीही त्यांचे स्वागत केले. रवींद्रनाथांनी त्यांना भारतात नृत्यशाळा काढण्याबद्दल प्रोत्साहित केले. भारतीय लोकनृत्यांतील पदलालित्य आणि मुद्राभिनय यांची जोड देऊन ही कला त्यांनी पाश्‍चात्यांसमोर आणली. त्यांनी आधुनिक बॅले नृत्याचा समावेश भारतीय नृत्यपरंपरेत केला. “उदय शंकर म्हणजेच भारतीय नृत्य’असे समीकरण युरोपियन देशांत रूढ झाले. त्यांच्या पत्नी पूर्वाश्रमीच्या अमला नंदी यांची पॅरिस येथे 1939 साली एका कार्यक्रमात गाठ पडली व त्या त्यांच्या नृत्यसमूहात दाखल झाल्या.

वर्ष 1939 मध्ये चेन्नई येथे उदय शंकर यांनी त्यांना प्रपोज केले व त्या अमला शंकर झाल्या. या दोघांची जोडी नृत्यामध्ये जगभर प्रसिद्ध झाली. ते भारतात स्थायिक झाले व उत्तरांचलमध्ये अलमोडा येथे ‘उदय शंकर भारतीय सांस्कृतिक केंद्र ‘स्थापन केले. या संस्थेत त्यांनी शंकरम नंबुद्री याना कथ्थकसाठी, कडप्पा पिलाई भरतनाट्यमसाठी व उस्ताद अल्लाउद्दीन खॉं यांना संगीतासाठी पाचारण केले. 1948 मधे त्यांनी कमला हा फक्‍त नृत्यावर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला व त्यामध्ये पत्नी अमला शंकर यांनींही नृत्य केले. सतारवादक रवीशंकर हे त्यांचे बंधू, त्यांची कन्या ममता याही नर्तिका आहेत तर पुत्र आनंद शंकर संगीतकार आहेत. उदय शंकर यांना 1971 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 26 सप्टेंबर 1977 रोजी त्यांचे निधन झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)