#विविधा: अभिनेते अरुण सरनाईक

माधव विद्वांस

“पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे !!’ हे गीत गाणारे तसेच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर वर टाकणारे अभिनेते अरुण सरनाईक यांचा आज 4 ऑक्‍टोबर हा जन्मदिन. त्यांचे वडील शंकरराव हे मराठी रंगभूमीवरील थोर मराठी गायक-अभिनेते होते. तसेच काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. त्यामुळे अभिनयाचा व गायनाचा वारसा त्यांचेकडे आलेला होताच. अरुण सरनाईक यांनी मुंबईतील रुईया कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी इचलकरंजी येथील एका कारखान्यात काही काळ काम केले. त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द नाटकातून सुरु केली.

सन 1956 मध्ये मो. ग. रांगणेकर यांच्या “भटाला दिली ओसरी’ या मराठी नाटकात त्यांनी अभिनय केला आणि नाट्यअभिनेत्याच्या क्षेत्रातही प्रवेश केला. 1 सप्टेंबर 1964 रोजी “अपराध मीच केला’ या नाटकातील कमांडर अशोक वर्टी ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली होती. अरुण सरनाईक हे एक यशस्वी तबला आणि हर्मोनियम वादकही होते. तसेच संगीताची जाण असल्यामुळे काही चित्रपटातील गाणीही त्यांनी गायली. सन 1961 मध्ये त्यांनी अनंत माने यांच्या “शाहिर परशुराम’ या चित्रपटात अभिनय करून चंदेरी दुनियेत प्रवेश केला. त्यांनी दिनकर पाटील यांच्या “वरदक्षिणा’ आणि नंतर “विठू माझा लेकुरवाळा’ या चित्रपटातही काम केले.

अभिनय क्षेत्रात त्यांनी सामाजिक, कौटुंबिक, पौराणिक, तमाशा प्रधान अशा सर्व प्रकारच्या चित्रपटात अभिनय करून आपली एक स्वतःची जागा निर्माण केली होते. “रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटात त्यांनी अभिनय व गाणे म्हणून करून आपले नाव चित्रपट सृष्टीत तत्कालीन अभिनेत्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नेले. उस्ताद अल्लारखॉं यांनी प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून त्यांच कौतुक केलं होतं. तेंव्हापासून बाळासाहेब ठाकरेही त्यांचे चाहते झाले होते. “एक गाव बारा भानगडी’, “मुंबईचा जावई’, “केला इशारा जाता जाता’, “सवाल माझा ऐका’, “सिंहासन’, “पाहू रे किती वाट’, ‘सुभद्राहरण’ या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केल्या.

“सुभद्राहरण’मध्ये दुर्योधनाचे काम करून खलनायकही रंगविला. तर “सिंहासन’मधे मुख्यमंत्री होऊन सिंहासनावरही बसले. या यशस्वी अभिनेत्याला अभिवादन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)