पुणे – शारीरिक आणि मानसिक छळ करून विवाहितेला लग्नानंतर दोन महिन्यातच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. यात पती, सासू, सासरा आणि नणंदेच्या पतीचा समावेश आहे. सत्र न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
जावेद खलील शेख (वय 25), जहीर अब्दुल शकुत (32), खलील अहमद शेख (46), सलिमा खलील शेख (45 सर्व रा. रा. जय मल्हार नगर, म्हसोबा मंदिर, थेरगाव) यांना शिक्षा सुनावण्यात आली. अफरोज शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची बहिण शबाना अब्दुलसमद शेख (रा. बीएसटी नगर, आरे रोड, पवई, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील सुरेश गवळी यांनी पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. फिर्यादी आणि डॉक्टरांची साक्ष यात महत्त्वाची ठरली. पैरवी अधिकारी म्हणून हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर यांनी काम पाहिले. त्यांना पोलीस हवलदार दीपक गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.
मयत अफरोज हिचे जावेद शेख बरोबर 12 मे 2011 रोजी लग्न झाले होते. आरोपी जहीर शकूर हा तिच्या नणंदेचा पती आहे. खलील शेख हा सासरा आणि सलिमा ही सासू आहे. आरोपींनी आपापसात संगनमत करून अफरोज हिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. माहेराहून हुंड्यापोटी पैसे आणि दागिने आणण्याच्या कारणावरुन तिचा छळ केला. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अफरोजने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा बचाव करण्यात आला होता. मात्र, डॉक्टरांनी दिलेल्या साक्षीत तिच्याबरोबर झटापट झाली असून त्यातून तिच्या हातावर जखमा झाल्या होत्या. तसेच एकापेक्षा अधिक लोकांबरोबर झटापट झाली होती, हा मुद्दा सरकारी वकील गवळी यांनी मांडला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा