सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) – मुलगा होत नसल्याने सतत त्रास देत तसेच नवीन ट्रकसाठी माहेरहून 5 लाख घेऊन ये असे म्हणत मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह सासूवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार शिरढोण, ता. कोरेगाव येथील निता यांचा चिंचणेर येथील भारतीय सैन्य दलात नोकरी करत असलेल्या विनोद दणाणे याच्यासोबत 10 मे 2016 रोजी विवाह झाला होता.

विवाहानंतर दोन वर्षांनी पती विनोद व सासु पुष्पा यांनी तुला मुल होत नाही असे म्हणत मारहाण करत त्यांना उपाशी ठेवण्यास सुरूवात केली. पती व सासुच्या त्रासाला वैतागून निता यांनी सन 2014 मध्ये सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पती व सासु यांनी त्रास देणार नसल्याचे कबुल केल्याने निता यांनी दाखल तक्रार माघारी घेतली व त्या नांदण्यासाठी सासरी गेल्या होत्या. निता यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा राग मनात असल्याने पती व सासू यांनी तक्रार का दाखल केली असे म्हणत नवीन ट्रक घेण्यासाठी माहेरावरून 5 लाख रुपये घेऊन ये अन्यथा निघून जा असे म्हणत मारहाण करून त्यांना घरातून हाकलून दिले.

याबाबत निता यांनी पती विनोद व सासु पुष्पा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)