विलास लांडे पुन्हा शिरूरच्या आखाड्यात

पिंपरी – शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत माजी आमदार विलास लांडे, ऍड. देवदत्त निकम आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. यामुळे विलास लांडे पुन्हा एकदा शिरूर लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

शेजारी-शेजारी असलेल्या मावळ आणि शिरुर लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांबाबत चर्चेला राजकीय वर्तुळात सध्या उधाण आले आहे. मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थच्या उमेदवारीची चर्चा होती. मात्र, मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पूर्वीचा खेड आणि सध्याच्या शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सलग चार वेळा विजय मिळवला आहे. चार निवडणुकांपासून अजय असणाऱ्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या विजयाचा वारू कोण रोखणार? असा प्रश्‍न सर्वांनाच होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही जागांवर जोर लावत आहे. शिरूरसाठी राष्ट्रवादीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादीच्या तीन भागांतील नेत्यांनी दावा केला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे, ऍड. देवदत्त निकम आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी या मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली आहे.

-Ads-

लोकसभा निवडणुकीत सातत्याने चार वेळा शिवसेनेवरच मतदारांनी विश्‍वास व्यक्‍त केला. विलास लांडे आणि ऍड. देवदत्त निकम यांनी पूर्वी देखील आढळराव-पाटील यांच्यासमोर येथूनच आव्हान उभे केले होते. परंतु या दोघांनाही अपयशाची कडवट चव चाखावी लागली होती. शिरुर लोकसभेसाठी वर्षापूर्वी भाजपकडून आमदार महेश लांडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. महेश लांडगे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात विविध माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु सध्या आमदार लांडगे यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना आवर घातल्याची चर्चा आहे. भोसरीच्या राजकीय वर्तुळात लांडे यांना लोकसभेत, तर लांडगे यांना विधानसभेत पाठवण्याची चर्चा आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे लांडे-लांडगे हे दोन्ही राजकीय महत्त्वाकांक्षी नेते राजकारणात टिकून राहावेत, असा या मागील हेतू आहे.

शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा शिरूरच्या जनतेवर कमालीचा भरवसा आहे. याच पाठबळावर त्यांनी “रौप्य महोत्सवी’ खासदार होण्याची तयारी खूप पूर्वीच सुरू केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळणाऱ्या इच्छुकाला मी एवढ्या लाख मतांनी पराभूत करेन, असा आत्मविश्‍वास ते व्यक्‍त करतात. अनेकदा त्यांनी उघडपणे अशी वक्‍तव्येही केली आहेत. शिवसेनेकडून आढळराव यांनाच उमेदवारी मिळण्याची सर्वाधिक शक्‍यता आहे. आता लोकसभेच्या तोंडावर शिवसेनेने शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये सदस्य अभियान सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या शिरुर आणि मावळ लोकसभेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. चर्चांच्या फेऱ्यांमध्ये अफवांची वादळे देखील उडत आहेत. त्यातच भाजपचे शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप मावळ लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. आमदार जगताप यांना स्वतःला या अफवेचे अधिकृतरित्या खंडन करावे लागले.

शिरूर आणि मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशी सूचना शरद पवार यांनी आढावा बैठकीत केली. राजकीय समीकरणे जुळवताना या दोनही मतदार संघांत तगडा उमेदवार देण्यात राष्ट्रवादीचा कस लागणार आहे. राजकारणाचा अनुभव असलेल्या विलास लांडे यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान पुन्हा एकदा स्वीकारले आहे. पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिल्यास ते कशा प्रकारे लढत देऊ शकतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

लांडे-लांडगेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न
लोकसभा व विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने राजकीय घडामोडींनी वेग घेतला असताना भोसरीतील जुन्या नेत्यांकडून आमदार महेश लांडगे व माजी आमदार विलास लांडे यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गुरु-शिष्य असलेल्या लांडे व लांडगे यांच्यामध्ये विळ्या भोपळ्याचे सख्य निर्माण झाले आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या कायम एकसंघ राहणाऱ्या भोसरीचे दोन तुकडे झाले आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघ व पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भोसरीकरांचा वरचष्मा कायम रहावा यासाठी काहीजणांनी लांडे व लांडगे यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. एकाने लोकसभा तर दुसऱ्याने विधानसभा लढविण्याच्या तडजोडीवर दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)