विलग होण्याची भीती

मानसी चांदोरीकर 
छोटी काव्या गेल्या महिन्याभरापासून सारखी रडते, झोपेतून दचकून रडत उठते, हुंदके देऊन देऊन रडते. काही सांगत नाही आणि एकदा रडायला लागली की, कितीही समजावलं तरी रडायची थांबत नाही. लवकर शांत होत नाही. एकटी एकटी बसून असते. अशी तक्रार काव्याच्या पाळणाघरातून वारंवार यायला लागली. शाळेतून सुद्धा याच काळात ती सारखी रडते. काही करत नाही. गाणी म्हणताना रडते. अशाच तक्रारी यायला लागल्या. सुरुवातीला आईनं दुर्लक्ष केले. नंतर तिला प्रेमान समजावलं, पण तक्रार कमी होण्याऐवजी वाढायलाच लागली. मग मात्र आईला काळजी वाटायला लागली आणि म्हणूनच स्वत:हून ती काव्याला घेऊन समुपदेशनासाठी आली.
आल्यावर आईने स्वत:ची छान ओळख करून दिली. तिची आई एका आय.टी. कंपनीमध्ये काम करत होती. घरात ती काव्या आणि तिचे बाबा असे 3 सदस्य होते. छोट्या काव्याचे वडीलही आय.टी. मध्येच काम करत होते. आई-बाबा दोघेही काव्याचे खूप लाड करायचे. तिची काळजी घ्यायचे. तिघांचही नात खूपच छान होतं. काव्याचा स्वभावपण हसरा, खेळकर, आनंदी होता. पाळणाघरात सगळ्यांची ती खूप लाडकी होती. वर्गात हुशार आणि चुणचुणीत मुलगी म्हणून बाईसुद्धा तिचं नेहमी कौतुक करायच्या. “पण गेल्या महिन्याभरात तिचं काय बिनसलयं तेचं समजत नाहीये. घरी, शाळेत, पाळणाघरात सारखी रडते, चिडचिड करते. तिचं जेवणपण खूप कमी झालंय. आम्हाला काहीच समजत नाहीये. तो तिकडे आणि मी इकडे खूप टेंशनमध्ये आहोत. प्लीज बघाल का? काय झालंय तिला? का वागायला लागलीये ती अशी?’
आईच्या या सगळ्या बोलण्यातून एक धागा मिळाला. तोच धरून पुढे संवाद सुरू ठेवला तेव्हा असं लक्षात आलं की, काव्याचे बाबा दोन महिन्यांपूर्वी कामानिमित्त कंपनीतर्फे परदेशात गेले आहेत. 4-5 महिन्यांनी ते परत येतील. सध्या तिचे बाबा इथे नसल्यामुळे तिचे आजी-आजोबा यांच्या सोबतीला राहायला आले आहेत. ते सुद्धा काव्याची खूप काळजी घेतात. आजी-आजोबा काव्याला खूप आवडतात. दरवेळी ते आले की, ही खूष असते, पण यावेळी त्यांच्याशीसुद्धा ती नीट बोलत नाहीये. आणखी काही माहिती घेतल्यावर पुढे सत्र निश्‍चित केले.
आईकडून मिळालेल्या माहितीतून काव्याच्या समस्येचा अंदाज आलाच होता. त्यामुळे पुढच्या 2-3 सत्रात तिच्याशी संवाद साधला. काही चित्रं, खेळ, गोष्टी यातून तिच्याशी छान संवाद साधल्यावर तिची समस्या लक्षात आली. आईबरोबरच्या संवादातून त्याचा अंदाज आलाच होता.
तिला वडिलांचा विरह खूप प्रकर्षाने जाणवत होता. ती त्यांना खूप “मिस’ करत होती. तिच्या छोट्याश्‍या वयाला बाबांपासून लांब राहणं खूपच अवघड जात होतं. रोज आपले लाड करणारे, आपल्याबरोबर खेळणारे, गोष्टी सांगणारे बाबा तिला खूप खूप दिवस झाले भेटलेच नव्हते. स्काईप मोबाईल यावरून त्यांचा संवाद चालू होता, पण तेवढ्याने तिच्या छोट्या मनाचे समाधान होत नव्हते. त्यांचा स्पर्श, त्यांच्याबरोबर घालवत असलेला वेळ, दंगा, मस्ती हे सारं ती खूप “मिस’ करत होती आणि ते सारं तिच्या रडण्यातून, दचकण्यातून, शांत राहण्यातून व्यक्‍त होत होताना दिसत होतं.
ही समस्या आईला समजल्यावर तिने लगेच वडिलांना याची कल्पना दिली. बाबाही बरेच प्रयत्न करून 10-12 दिवसांची सुट्टी काढून परत आले. बाबा येताच छोटी काव्या त्यांना जाऊन बिलगली आणि रडायला लागली. बाबांनाही रडू आवरणे अवघड गेले. त्यानंतरचे काही दिवस तिने व बाबांनी एकत्र घालवले. या काळात त्यांना सांगितल्याप्रमाणे दोघांनीही तिच्याशी वारंवार संवाद साधून बाबा पुन्हा थोड्या दिवसांसाठी जाऊन परत येण्यार असल्याबाबत तिची मानसिकता हळूहळू तयार केली. 10-12 दिवसांनी बाबा परत गेले, पण यावेळी काव्या एकदम छान होती. बाबा थोड्या दिवसांनी परत येणार आहेत, हे तिच्या मनात पक्‍के बसल्याने आता त्यांच्यापासून विलग होण्याची भीती तिच्या मनात उरली नव्हती.
(केसमधील नावे बदलली आहेत.) 
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)