विरोध झुगारून विद्यापीठाकडून वेळापत्रकानुसार परीक्षा

सत्र परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी : आजपासून पेपर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा वेळापत्रकानुसार शुक्रवारपासून (दि.27) सुरू होणार आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन करत असलेल्या काही विद्यार्थ्यांपुढे विद्यापीठाकडून विविध पर्याय ठेवल्यानंतरही त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने विद्यापीठाने आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी या परीक्षांना बसावे, असे आवाहनही केले आहे.

इंग्रजी विभागातील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याच्या तीन दिवस आधी सत्र परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी पत्राद्वारे केली. या मागणीसाठी आंदोलन सुरू केल्यानंतर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, इंग्रजी विभागातील प्राध्यापक हेमंत शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “आल्टर्नटिव्ह लिटरेटर-1′ (एल.जी.बी.टी.) या विषयाच्या पेपरबाबत काही समस्या असल्यास त्याची परीक्षा पुढे ढकलली जाईल. वेळापत्रकानुसार हा पेपर 30 एप्रिल रोजी नियोजित होता. तो 8 मे रोजी दुपारी किंवा 9 मे रोजी घेण्याची तयारी विद्यापीठाने दर्शवली. त्याला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नकार दिला.

मात्र, संपूर्ण वेळापत्रक बदलणे हे इतर अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे होते. याबाबत विभागाच्या काही विद्यार्थ्यांनी मिळून इंग्रजी विभागाला व कुलगुरू कार्यालयाला तसे पत्र दिले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर इंग्रजी विभागाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला बसणार का, हेच आता पाहावे लागणार आहे.

विद्यार्थी उपोषणावर ठाम
गेल्या तीन दिवसांपूर्वी इंग्रजी विभागातील 15 ते 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी विद्यापीठात उपोषणाला बसले आहेत. परीक्षा पुढे ढकला, तर उपोषण मागे घेणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. गुरुवारी विद्यापीठाने परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थी उपोषणावर ठाम राहणार असल्याचे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)