विरोध केवळ टिकेचे राजकारण करतातः आ. राजळे

सोनविहिर व दादेगाव येथील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन
शेवगाव – पक्षीय भेद किंवा गटातटाचे राजकारण केले नाही. सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून विकास कामे केली. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना गाव व वाडयावस्त्यांपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शासन व जनता यांच्यातील दुत म्हणून काम करीत असतांना बेरजेचे राजकारण केले. राजकीय हेतूने कोणाला विनाकारण त्रास दिला नाही. मात्र, विरोधकांनी केवळ टिकेचे राजकारण सुरु केले असल्याची टिका आमदार मोनिकाताई राजळे यांनी केली.
सोनविहीर ते रा.मा. 50 या 4 किमी तसेच दादेगांव ते शेवगाव या 6 किमी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सुमारे 5 कोटी 48 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भुमिपूजन आ.राजळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या सोनविहीर येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर होते. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा कमल खेडकर, चापडगांवच्या सरपंच संजिवनी गायकवाड, रज्जाक शेख, ग्रामपंचायत सदस्या सुमन विखे, गहिनीनाथ विखे, मच्छिंद्र विखे, रंगनाथ बटुळे, संजय खेडकर, रविंद्र तानवडे, अशोक तानवडे, अंकुश कुसळकर, विनोद मोहिते, दिगंबर काथवटे यांच्यासह परिसरातील गावांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. राजळे म्हणाल्या, लोकप्रतिनिधी हा कुठलेही काम स्वत:च्या पैशाने करत नसतो. जनतेने शासनाच्या तिजोरीत कर रुपाने भरलेल्या पैशातून ती होत असतात. त्यामुळे विकास काम करतांना आपण खुप मोठे आहोत. माझ्यामुळेच हे काम झाले आहे, अशी भावना मी कधीही मनात ठेवत नाही. केवळ जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक गाव व वाडया-वस्त्यांसाठी निधी आणण्याचा प्रयत्न करत असून या मतदार संघातील जलसंधारण व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या कामाकरीता ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून भरीव निधी मिळाला आहे. यापुर्वी सत्तेत असलेल्यांनी अनेक विकास कामे प्रलंबित ठेवलेले आहे. त्या कामांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. त्याच प्रमाणे प्रत्येक गावाला कसा निधी देता येईल,यासाठीही प्रयत्नशील आहे. कुठलेही प्रश्न पुर्णपणे सुटत नसतात व ते सोडवले जातील,असा माझाही दावा नाही. मात्र समाधान होईल असे काम गेल्या चार वर्षाच्या कालावधीत केले आहेत, असे त्या म्हणाल्या.
यावेळी बापुसाहेब पाटेकर, वाय.डी कोल्हे, अरुण मुंडे, उमेश भालसिंग, उपनगराध्यक्ष वजीर पठाण यांची भाषणे झाली. प्रास्ताविक राम केसभट यांनी तर सुत्रसंचालन प्रमोद विखे यांनी केले. तर आभार उदय मुंढे यांनी मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)