विरोधी पक्षनेत्यांची स्वकीयांकडून “कोंडी’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची स्वपक्षातील नगरसेवकांमुळे कोंडी होत आहे. कचरा निविदा प्रक्रिया आणि दिल्ली दौऱ्याबाबत पक्षाच्या भूमिकेला परस्पर विरोधी भूमिका राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी घेतल्यामुळे साने यांची अडचण होताना दिसत आहे.

महापालिका हद्दीतील घरोघरचा कचरा संकलित करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे. त्याला पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षांकडूनही विरोध करण्यात आला होता.

-Ads-

माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या कार्यकाळात हाच विषय स्थायी समिती सभेत मांडला होता. मात्र, तत्कालीन सदस्यांनी हा विषय हाणून पाडला. मात्र, स्थायी समितीच्या विद्यमान अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा विषय मंजूर करण्यात आला. त्यासाठी संबंधित ठेकेदारांकडून निविदा दर कमी केल्याचा दुजोरा दिला आहे. परंतु, कचरा संकलन संदर्भातील या विषयाला विरोध करावा, अशा सूचना वजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडून देण्यात आले होते. मात्र, स्थायी समिती सभेमध्ये केवळ नगरसेविका गीता मंचरकर यांनी ठरावाच्या विरोधात भूमिका घेतली. अन्य दोन नगरसेवकांनी याबाबत जुजबा विरोध केला. तसेच, शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनीही विरोध नोंदवला आहे. सत्ताधारी पक्षाच्या स्थायी समितीने हा विषय मंजूर केला.

याबाबत विचारले असता विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, पक्षातील वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार मी आमच्या पक्षातील तीनही स्थायी समिती सदस्यांना कचरा संकलन संदर्भातील निविदेला विरोध करण्याबाबत सांगितले होते. त्यापैकी नगरसेवक राजू मिसाळ आणि गिता मंचरकर यांनी विरोध केला आहे. ठरावाच्या विरोधात नगरसेवकांनी भूमिका घेतली आहे, तरीही राष्ट्रवादीतील नगरसेवकांच्या स्वाक्षरीने ठराव मंजूर झाल्याचे भासवत आहेत.

मयूर कलाटेंचा विरोध व्यक्‍तीगत
दरम्यान, दिल्ली येथील शाळांच्या पाहणीसाठी सर्वपक्षीय गटनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दौरा काढला. या दौऱ्यात विरोधी पक्षनेते दत्ता साने हेही उपस्थित होते. मात्र, राष्ट्रवादीचे वाकड येथील नगरसेवक मयूर कलाटे यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी दौऱ्यांवर उधळपट्टी करण्यापेक्षा शहरातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर द्यावा, अशा मागणीचे प्रसिद्धी पत्रक काढले होते. तसेच, अभ्यास दौऱ्यांवर होणाऱ्या वारेमाप खर्चावरही टिप्पणी केली होती. याबाबत साने यांना विचारले असता ते म्हणाले की, मयूर कलाटे यांनी मी दौऱ्यात आहे म्हणून विरोध केलेला नाही. वास्तविक, कलाटे यांचा विरोध अन्य लोकांना होता. त्यामुळेच त्यांनी पत्रक काढले. याबाबत माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. दोन दिवसांत मयूर कलाटे याबाबत खुलासा करतील, अशी सारवासारव साने यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

माजी महापौर वैशाली घोडेकर यांचा संताप
दिल्ली येथील शाळांची पाहणी दौरा ही बाब स्वागतार्ह आहे. त्याचा शहराला फायदाच होणार आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने या दौऱ्याचे अभिनंदन करणार होतो. पण, नगरसेवक मयूर कलाटे यांनी दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. ही बाब योग्य नाही. विरोधी पक्षनेते दत्ता साने स्वत: दौऱ्यात सहभागी असताना कलाटे यांनी आत्ताच प्रसिद्धी पत्रक काढणे योग्य नाही. आम्ही बाब खटकली आहे, असे मत माजी महापौर आणि नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी व्यक्‍त केले. दरम्यान, कचरा संकलन निविदा प्रक्रिया आणि दिल्ली दौऱ्याबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये मतभिन्नता दिसत आहे. तसेच, विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेवक यांच्यातील समन्वय कमी झाला आहे का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)