विरोधकांना दिलासा आणि संभ्रमही!

देशातील विरोधी पक्ष निष्प्रभ व हतबल अवस्थेतून जात आहेत. पण या आठवड्यात त्यांना काहीसा दिलासा देणाऱ्या घटना घडल्या. त्याबरोबरच चिंता वाढविणाऱ्या बातम्याही विविध प्रसारमाध्यमातून झळकल्या. पाटणा येथे झालेल्या “भाजप भगाओ देश बचावो’ या विरोधकांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला, या रॅलीला बहुतेक सर्व विरोधी पक्षांचे प्रतिनिधीही हजर राहिले. तर दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने भाजप विरोधक विशषेतः आम आदमी पक्ष निश्‍चितच सुखावला असणार. या दोन आशादायक घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संयुक्त जनता दलापाठोपाठ एनडीएच्या कळपात जाणार, शरद पवार मोदी सरकारमध्ये सामील होणार अशा बातम्या (की अफवा?) पसरल्या आणि त्यामुळे विरोधकांच्या छातीतील धडधड निश्‍चितच वाढली असणार.

लालूप्रसाद यादव, त्यांचे चिरंजीव तेजस्वी यांनी पाटण्यात आयोजित केलेल्या “भाजप भगो, देश बचावो’ रॅलीला जनतेने प्रचंड गर्दी केली. भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही लालूंच्या रॅलीला एवढी गर्दी होणे, ही त्यांना सुखावणारीच बाब होती. नितीशकुमार स्वतःला बिहारचे कर्ते-करविते मानतात. त्यांच्याच राज्यात लालूंनी ही गर्दी जमविली. बाराहून अधिक विरोधी पक्षांचे प्रमुख या रॅलीला पाटण्यात आले. हेही विशेष. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नव्हते, पण त्यांचे प्रतिनिधी होते. या रॅलीत देशपातळीवर “महागठबंधन’ करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला. ही बाब विरोधकांना दिलासा देणारी आहे.

सोनिया गांधी, राहुल गांधी, मायावती, शरद पवार यांनी या रॅलीला न येणे पसंत केले तरी त्यांचे प्रतिनिधी होते हे खरे असले तरी या नेत्यांची उपस्थिती विरोधकांच्या ऐक्‍याला आणखी बळ देणारी ठरली असती. सोनिया गांधी हल्ली आजारी असतात, पण राहुल यांना विरोधी ऐक्‍यापेक्षा नॉर्वेचा दौरा अधिक महत्त्वाचा वाटला. मायावतींना जागा वाटप आधी हवे आहे. शरद पवार पुण्यातील एका उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला नितीन गडकरींबरोबर हजर होते. गांधी मायलेकांनी “भ्रष्टाचारांच्या आरोपांनी वेढलेल्या लालूंना टाळले असा अर्थ काढला गेला. असे असले तरी या रॅलीच्या यशस्वितेमुळे विरोधकांचे मनोबल वाढण्यास निश्‍चित मदत होणार आहे.

आम आदमी पक्ष (आप) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये राजधानी दिल्लीत तुंबळ राजकीय युद्ध सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने काही माध्यमांना हाताशी धरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आपच्या इतर नेत्यांविरुद्ध आरोपांची राळ उठविली. आपच्या पंजाब विधानसभा व दिल्ली महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर ही मोहीम अधिकच तीव्र झाली होती. त्यानंतर केजरीवाल मौनात गेले आणि त्यांनी विधायक कामांचा सपाटा लावला. दिल्लीत आता आप सपाट होणार, दिल्लीत आता फक्त भाजपचेच राज्य असे चित्र निर्माण केले गेले.

पण विधानसभेच्या बनाना मतदारसंघातील पोट निवडणुकीत आपने भाजप उमेदवाराचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव केला आहे. भाजपचे यावेळचे उमेदवार पूर्वी आपचे आमदार होते. पण नंतर त्यांनी आपला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. हे पक्षांतर मतदारांनी सपशेल नाकारून भाजपला धक्काच दिला आहे. भाजपमध्ये प्रवेश केला की पुन्हा यश मिळतेच असे नाही. हा एक इतर इच्छुकांना एका अर्थाने संदेशच म्हणायला हवा.

या पोटनिवडमुकीत आप व भाजप यांच्या मतांच्या टक्केवारी, घट झाली आहे. पण या मतदारसंघातील कॉंग्रेसच्या मतांची टक्केवारी 7.8 टक्‍क्‍यांवरून 24.21 टक्‍क्‍यांपर्यंत वाढली आहे हे विशेष. दिल्लीत गेल्या 3 वर्षांत कॉंग्रेस नगण्य झाली होती. पण आता त्या पक्षाची मते लक्षणीय प्रमामात वाढली आहेत, याची दखल आजची माध्यमे घेणारही नाहीत पण भाजपने त्याकडे पूर्ण डोळेझाक करून चालणारे नाही.

पश्‍चिम बंगालमध्ये पाय रोवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या साऱ्या मार्गांचा वापर भाजप करीत आहे. पण तेथे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसने पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे. 148 पैकी 140 जागा त्यांनी जिंकल्या. भाजपला 4 जागाच मिळाल्या. कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. पण बहुतेक माध्यमांनी भाजपने खाते उघडले, कॉंग्रेसचे पानिपत यालाच जास्त महत्त्व देत तृणमूल कॉंग्रेसचा विजय दुय्यम ठरविण्याचा प्रयत्न केला.

या काहीशा दिलासा देणाऱ्या, आशेचा किरण दाखविणाऱ्या घटना घडत असतानाच दुसऱ्या बाजूला एका बातमीमुळे विरोधकांच्या चिंतेत काही काळ का होईना भर पडली असणार. शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एन.डी.ए.त सामील होणार, केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार, कृषि वा संरक्षणमंत्री होणार ही ती बातमी. शरद पवार कधी कोणती भूमिका घेतील, हे त्यांचे विश्‍वासू सहकारी पण ठामपणे सांगू शकत नाहीत. त्यामुळे पुन्हा संशयकल्लोळ वाढलाच.
विरोधी पक्षांच्या सोनिया गांधी यांनी बोलाविलेल्या बैठकीस न जाणे, पाटण्याच्या सभेला न जाता नितीन गडकरींबरोबर स्थानिक उड्डाणपुलाच्या भूमिपूजनालाच प्राधान्य, केंद्रीय मंत्रिमंडळाचा काहीसा लांबलेला विस्तार या पार्श्‍वभूमीमुळे या बातमीची जास्त चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस ही भाजपचीच “बी टीम’ आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आम्हाला गरज नाही, अशी विधाने काही कॉंग्रेस नेत्यांनी केल्याने “हे असे होऊ शकते’ अशा चर्चेला वाव मिळाला. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांनी या शक्‍यतेचा जरूर इन्कार केला पण शरद पवार यांनी जाहीरपणे ठासून काहीच न सांगितल्याने अंदाज व्यक्त होत राहिले.

कायम संभ्रम राहील अशी भूमिका शरद पवार आजवर सतत घेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात बाकी सर्व गुण असले तरी त्यांच्या विशावासार्हतेबद्दल शंका उपस्थित केली जाते. हे खरे तर त्यांच्या स्वतःच्या आणि पक्षाच्या दृष्टीने हिताचे नाही. पण ती त्यांची शैलीच निर्माण झाली आहे. विरोधकांमधील प्रमुख पक्ष कॉंग्रेस आहे. पवारांची नाळ, विचारसरणीही कॉंग्रेसचीच आहे. पण कॉंग्रेस नेतृत्वाकडून वारंवार डिवचणारी विधाने केली जाणार असतील, तर गप्प बसणाऱ्यातील पवार नव्हेत. त्यामुळे आपल्या विचारसरणीचा नेता दुरावणार नाही, हेही कॉंग्रेसने पहायला हवे. पवार यांनी पक्ष कार्यकर्ते, एकूणच विरोधक यांना फार संभ्रमात न ठेवता आपल्या भोवतीचा संशयकल्लोळ दूर करायला हवा. तरच विरोधकांचे मनोबल वाढेल. अन्यथा निराशा आहेच.
– शेखर कानेटकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)