विरोधकांची महाआघाडी स्थापण्याच्या प्रयत्नांना मायावतींकडून धक्का?

कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता: इंधन दरवाढीशी संबंधित वक्तव्याने संभ्रम
लखनौ – बसपच्या प्रमुख मायावती यांनी इंधन दरवाढीसाठी केंद्रातील मोदी सरकारबरोबरच मागील यूपीए सरकारला जबाबदार धरले. त्यांच्या त्या वक्तव्यामुळे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मायावतींची कृती विरोधकांची महाआघाडी स्थापण्याच्या प्रयत्नांसाठी धक्का असल्याची भावना कॉंग्रेसमध्ये बनली आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी समर्थपणे दोन हात करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणून महाआघाडी स्थापण्याच्या हालचाली कॉंग्रेसने सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू असल्याचे संकेत इंधन दरवाढीच्या विरोधात नुकत्याच पुकारण्यात आलेल्या भारत बंदमधून मिळाले. त्या बंदमध्ये अनेक विरोधी पक्ष सहभागी झाले. मात्र, बसप बंदपासून दूर राहिला.

एवढेच नव्हे तर, बंदच्या दुसऱ्या दिवशी मायावती यांनी इंधन दरवाढीचा निषेध करताना त्यासाठी मोदी सरकारबरोबरच कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील यूपीए सरकारला जबाबदार धरले.

मायावतींच्या त्या वक्तव्यामुळे जनतेमध्ये विरोधकांच्या ऐक्‍याबाबत चुकीचा संदेश गेल्याचे काही कॉंग्रेस नेत्यांना वाटत आहे. भाजपकडून विरोधकांच्या ऐक्‍याच्या प्रयत्नांची खिल्ली उडवली जात आहे. त्यामुळे मायावतींचे वक्तव्य भाजपला आयतीच संधी मिळवून देणारे असल्याचेही त्या नेत्यांना वाटते. विरोधकांच्या महाआघाडीचा घटक बनण्यास मायावती उत्सुक आहेत की नाही असा संभ्रम आता निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगढमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांमध्ये बसपला बरोबर घेण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्राचा भाग म्हणूनही मायावतींनी इंधन दरवाढीशी संबंधित ते वक्तव्य केले असावे, असेही कॉंग्रेसमधील एका घटकाला वाटत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)