विरोधकांची दिल्लीतील बैठक लांबणीवर

ममतांच्या भेटीनंतर चंद्राबाबूंची घोषणा

कोलकता  – भाजपशी राजकीय संघर्ष करण्याच्या उद्देशाने विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतलेले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी येथे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर चंद्राबाबूंनी विरोधकांची दिल्लीतील 22 नोव्हेंबरची प्रस्तावित बैठक लांबणीवर टाकण्याची घोषणा केली. सध्या पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे ते पाऊल उचलण्यात आले.

आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत मोदी सरकारकडून अनुकूल प्रतिसाद न मिळाल्याने काही महिन्यांपूर्वी चंद्राबाबूंच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्ष (टीडीपी) सरकार आणि एनडीएमधून बाहेर पडला. त्यानंतर चंद्राबाबूंनी भाजप आणि मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातूनच त्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक होणार असल्याचे जाहीर केले. मात्र, आता ती बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. बैठकीची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे चंद्राबाबूंनी ममतांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत ममताही होत्या.

दरम्यान, आंध्र आणि पश्‍चिम बंगाल सरकारांनी शुक्रवारी त्यांच्या राज्यांमध्ये छापे टाकण्यास किंवा चौकशी करण्यास सीबीआयला मनाई केली. त्या पाऊलाच्या पार्श्‍वभूमीवर चंद्राबाबू आणि ममतांमधील भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभाग या यंत्रणांचा मोदी सरकारकडून गैरवापर केला जात आहे. आरबीआय, कॅग या संस्थाही प्रचंड दबावाखाली आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)