विरोधकांकडे केवळ मोदी हटावचे दिवास्वप्न: शहा

मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वावर भाजप कार्यकारिणीचा भरवसा

2019 च्या निवडणूक अधिक जागांसह विजयी होण्याचा आत्मविश्‍वास

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये विरोधकांच्या दिवास्वप्नाविरोधात संघर्ष करण्याचे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत नवभारताची उभारणी करण्याचे ध्येयही पक्षाला दिले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये या संदर्भातील ठराव मंजूर करण्यात आले आहेत.

देशामध्ये दारिद्रय, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि जमातवाद नसलेल्या नवभारताची उभारणी पंतप्रधानांकरवी केली जात आहे. नैराश्‍य आलेल्या विरोधकांकडे केवळ “रोको मोदी’हा एकमेव अजेंडा आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना सांगितले.

“2019 मध्ये भाजप अधिक जागा आणि मताधिक्‍याने पुन्हा एकदा सत्तेवर येईल. भाजपचा पराभव करण्याचे दिवास्वप्न विरोधक बघत आहेत. विरोधकांकडे कोणीही नेता किंवा कोणतेही धोरण नाही. केवळ मोदींना रोखणे हा नकारात्मक कार्यक्रमच विरोधकांकडे आहे. जनतेला असे नकारात्मक राजकारण आवडत नाही.’ असे जावडेकर म्हणाले.

भाजपचे माजी अध्यक्ष आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अंतर्गत सुरक्षेबाबत सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्याचा प्रस्ताव मांडला. याशिवाय “युपीए’च्या कारकिर्दीशी तुलना करता देशभरात दहशतवादी कृत्यांना रोखण्यावरही त्यांनी भर दिला. “युपीए’च्या काळात देशभरात बॉम्बस्फोट होतच असत, असा दावाही त्यांनी केल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शवणारा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. मोदी यांची दृष्टी आणि शहा यांचे संघटनात्मक कौशल्य यामुळे भाजप 19 राजांमध्ये सत्तेवर आहे. यादोघांच्या जोडीमुळेच भाजपचे 350 पेक्षा अधिक खासदार आणि 1500 आमदार आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. सरकारने 2022 पर्यंत नवभारताची उभारणी करण्याच्या दृष्टीने भरीव कामगिरी केल्याचेही या ठरावात म्हटले आहे.

“सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार काम करणाऱ्या मोदी यांना 70 टक्‍क्‍यांहून अधिक मान्यता आहे. चार वर्षात एवढा जनाधार मिळणे ही अभूतपूर्व बाब आहे. अंतर्गत सुरक्षेबाबतच्या ठरावात भाजपच्या सरकारच्या काळात नक्षलवादाचे क्षेत्र दोनतृतीयांश घटले आहे. शांतता निर्माण झाल्याने ईशान्येतील अनेक भागांमधून “ऍफ्स्पा’ कायदा हटवण्यात आला आहे. अंतर्गत सुरक्षेशिवाय विकासाचा पाया रचला जाऊ शकणार नाही, असे म्हटले आहे.

आर्थिक बाबतीत देश सहाव्या क्रमांकाची अर्थसत्ता बनली आणि “जीएसटी’मुळे महसूलात वाढ झाली आहे. जनतेच्या अडचणी सरकारने दूर केल्याने जनतेला आता याबाबत काही अडचणी नसल्याचेही ठरावात म्हटले आहे.
महागाईचा दर “युपीए’च्या काळात 10 टक्के होता आणि मोदी सरकारच्याकाळात 5 टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. भाजपने नेहमीच सर्व गटांच्या हितांचा विचार केला आहे. दरवाढीबाबतही सरकार योग्य ती धोरणे राबवत असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)