विरार ते राजकोट… पृथ्वीची आश्‍चर्यकारक वाटचाल

नवी दिल्ली: भारताचा युवा फलंदाज आणि 19 वर्षांखालील विश्‍वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याने वेस्ट इंडीजविरुद्ध आज सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करीत एकाच वेळी अनेक विक्रमांना गवसणी घातली. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीचा एकंदर स्तर कसोटी क्रिकेटचा किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचा होता किंवा नाही हा वेगळा विषय आहे. परंतु पृथ्वीने पहिला चौकार लगावल्यावरच तो यशस्वी होणार हे स्पष्ट झाले होते.

वयाची 19 वर्षे पूर्ण करण्यासाठी अद्याप किमान 36 दिवस बाकी असताना पृथ्वीने दाखविलेली परिपक्‍वता अपवादात्मक अशीच होती. जेमतेम चार फूट उंचीचा पृथ्वी मुंबईतील लोकलच्या गर्दीशी झुंज देत विरार ते बांद्रा आणि परत हा प्रवास केवळ क्रिकेटच्या ओढीने करीत असे. तेव्हा रोज पहाटे 4 वाजता विरारपासून सुरू झालेला पृथ्वीचा प्रवास आता राजकोटच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये येऊन थांबला आहे. पृथ्वीची ही वाटचाल आश्‍चर्यकारक अशीच आहे.
शालेय वयात रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूलकडून खेळताना हॅरिस शील्ड स्पर्धेत 546 धावांची खेळी करून पृथ्वीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर तो थांबलाच नाही. रणजी करंडक स्पर्धेच्या थेट उपान्त्य सामन्यात पदार्पणाची संधी मिळाल्यावर पृथ्वीने ही सुवर्णसंधी शतकाने साजरी केली. पाठोपाठ 19 वर्षांखालील विश्‍वचषक विजेतेपद, दुलीप करंडक स्पर्धेतील पदार्पणातही शतक आणि भारत अ संघाकडून काही नेत्रदीपक आणि शैलीदार खेळी केल्यावर पृथ्वीला अखेर संधी मिळाली आणि त्याने शतकी खेळी करीत या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.

-Ads-

सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक वर्षी मुंबईतील क्रिकेटविश्‍वाला “दुसऱ्या सचिन’ची प्रतीक्षा होती. पृथ्वीच्या शतकी कसोटी पदार्पणामुळे मुंबईला दुसरा सचिन मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. परंतु मुंबईला पहिला पृथ्वी शॉ निश्‍चितपणे मिळाला आहे. वयाच्या 12व्या वर्षी 14 वर्षांखालील टी-20 स्पर्धेत द्विशतक फटकावल्यावर पृथ्वी शॉ अनुभवी क्रीडा समीक्षक मकरंद वायंगणकर यांच्या डोळ्यात भरला. पाठोपाठ एसजी समूहाकडून तब्बल 36 लाखाचा आर्थिक पुरस्कार मिळाला.

पृथ्वीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे एमआयजी क्‍लबमधील पृथ्वीचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी यांनी लवकरच ओळखले. अपयश हा पर्यायच पृथ्वीच्या कोशात नव्हता, असे सांगून शेट्टी म्हणाले की, तो 10 वर्षांचा असतानाच मुख्य प्रशिक्षक किरण मोकाशी यांनी पृथ्वीला वरिष्ठ खेळाडूंच्या सराव सत्रात समाविष्ट केले. पृथ्वीला दुखापत होऊ नये, यासाठी त्याला बाऊन्सर टाकण्यास मात्र त्यांनी मनाई केली होती. बाकी कोणतीही अट त्यांनी वरिष्ठ खेळाडूंना घातली नव्हती. बॅकफूटचे फटके हे पृथ्वीचे वैशिष्ट्य असून राजकोटमध्ये सुरू झालेला त्याचा प्रवास कुठपर्यंच जातो याकडे आपल्या सर्वांचे लक्ष आहे.

पृथ्वीची विक्रमांना गवसणी

केवळ 18 वर्षे व 329 दिवस वय असलेल्या कोवळ्या पृथ्वी शॉने पदार्पणाच्याच कसोटी सामन्यात शतक झळकावताना एकाच वेळी अनेक विक्रमांना गवसणी घातली. याअगोदर रणजी करंडक स्पर्धेतील पदार्पणात शतक झळकावणाऱ्या पृथ्वीने त्यानंतर दुलीप करंडक स्पर्धेतही पदार्पणात शतकी खेळी केली होती. आजच्या शतकामुळे रणजी व दुलीप करंडकापाठोपाठ कसोटीतही शतकी पदार्पण करणारा पृथ्वी शॉ हा पहिला भारतीय ठरला. तसेच सर्वांत कमी वयात पहिले कसोटी शतक झळकावणारा पृथ्वी हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पृथ्वी शॉ हा 293वा क्रिकेटपटू ठरला आहे. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 वर्षांखालील विश्‍वचषक जिंकला होता.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)